सुरक्षेच्या नावाखाली महापालिकेची उधळपट्टी

लाखो रुपयांचे बॅग स्कॅनर मशीन भर पावसात : सुरक्षा वाऱ्यावर

पुणे – महापालिकेत येणाऱ्यांच्या बॅग तसेच इतर वस्तू तपासण्यासाठी लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली बॅग स्कॅनर मशीन भर पावसात बंद खोक्‍यात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मशीन महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत यावरील लाकडी खोके पावसात भिजून मशीनमध्ये पाणी शिरल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या नावाखाली केलेल्या या उधळपट्टीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापालिकेत दररोज मोठी वर्दळ असते, त्याचा गैरफायदा घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारापासून सुरक्षा व्यवस्था आहे. तर आयुक्त कार्यालयाकडे आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांकडे जाणाऱ्या गॅलरीमध्ये मेटल डिटेक्‍टर आहेत. प्रवेशद्व्रारावरच सुरक्षा वाढविल्यास गैरप्रकार टाळणे शक्‍य होईल, यासाठी ही मशीन खरेदी करण्यात आली. मात्र, यानंतर ही मशीन अजूनही बॉक्‍स बंदच आहे. बंद मशीन सुरक्षित ठिकाणी ठेवणे अपेक्षित असताना ती चक्क उघड्यावर आणि भर पावसात ठेवली असून त्यात पाणी जाऊ नये, म्हणून ताडपत्री टाकण्यात आली आहे. मात्र, ही ताडपत्री फाटलेली असून मशीन ठेवलेल्या बॉक्‍सवर पावसाच्या पाण्याचे शेवाळ चढले आहे. त्यामुळे या बॉक्‍समध्येही पाणी गेल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कोणी खरेदी केली माहितीच नाही!

या मशीनबाबत सुरक्षा विभाग, मध्यवर्ती भांडार विभाग, विद्युत विभाग, भवन रचना विभाग या सर्व विभागांमध्ये या मशीनबाबत चौकशी केली असता, कोणत्याही विभागास ही मशीन कोणी खरेदी केलेली आहे, याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे यासाठीचा लाखो रुपये कोणी खर्च केले आणि कशासाठी घेतली, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या नवीन इमारतीच्या सुरक्षेसाठी ही मशीन घेतल्याची शक्‍यता काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मात्र, ती बसावायची कोठे आणि त्याचे करायचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात असतानाच; याबाबत कोणत्याच विभागास माहिती नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
16 :cry:
74 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)