सुरक्षा रक्षकात दडलाय अवलिया चित्रकार

पिंपरी – जगण्याच्या संघर्षात अनेकजण आपले छंद विसरुन जातात. मात्र त्यातूनही मार्ग काढत काहीजण आपले छंद पुर्ण करतात. जगण्याच्या संघर्षातही अशीच आपली आवड आणि कला रहाटणी-नखातेवस्ती येथे राहणारे 65 वर्षीय सुरक्षा रक्षक रावसाहेब चक्रनारायण यांनी जोपासली आहे. रावसाहेब पिंपरी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतील एटीएमवर सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहतात. हे काम करत असतानाच ते दिवसभर हातात पेन्सिल स्केचद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींची हुबेहुब चित्रे रेखाटत असतात.

रावसाहेब मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील असून ते 1990 साली पुण्यात भोसरी येथील औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीच्या शोधात दाखल झाले. विविध कंपन्यांमध्ये त्यांनी वेल्डर, फिटरचे काम केले. रावसाहेब यांना तीन मुली आहेत. त्यापैकी दोघींची लग्न झाली असून एक मुलगी शिक्षण घेत आहे. त्यामुळे सेवा निवृत्तीनंतरही रावसाहेब सध्या एटीएमसाठी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. एटीएमची देखरेख करतानाच ते चित्र रेखाटण्याचा छंद जोपासत आहेत. त्यातून त्यांनी आजवर त्यांनी हजारो लोकांची चित्रे रेखाटली आहेत. चित्रकलेचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना त्यांनी अगदी हुबेहुब काढलेली चित्रे पाहून व त्यांचे चित्रकलेचे कौशल्य पाहून एटीएममध्ये येणारे नागरीक आचंबित होतात. काही नागरिक त्यांच्याकडून आवर्जून स्वत:ची चित्रे काढून घेतात. त्यातूनही दोन पैसे मिळत असल्याचे रावसाहेब यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या 6 वर्षात त्यांनी पेन्सिल स्केचद्वारे त्यांनी महापुरुष, राजकीय नेते, अभिनेते, अभिनेत्रींची हुबेहुब चित्रे रेखाटली आहेत. त्याशिवाय ते त्यांच्याकडे येणाऱ्या लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांचीच चित्रे काढून देत असतात. त्यांच्या कलेची दखल घेवून बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार देखील केला असल्याचे ते सांगतात. सकाळी 8 ते रात्री 8 अशा बारा तासाच्या ड्युटीच्या कालावधीत रावसाहेब दिवसभरात एक किंवा दोन चित्र रेखाटून पुर्ण करतात.

नोकरीतून निवृत झाल्यावर गरज म्हणून सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागलो. सुरवातीला 12 तास ड्युटीवर बसून कंटाळा यायचा. त्यामुळे चित्रकलेचा छंद या माध्यमातून जोपासण्याचे ठरवले. सुरुवातीला 2 वर्ष मला हुबेहुब चित्रे रेखाटता येत नव्हती. मात्र सरावाने चित्रे जमू लागली तसेच येणारे-जाणारे माझे कौतुक करत असत. त्यामुळे मला प्रेरणा व प्रोत्साहन मिळत गेले.
– रावसाहेब चक्रनारायण, सुरक्षा रक्षक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)