सुरक्षा रक्षकांची ठेकेदारी पुढील कार्यवाहीपर्यंत कायम राहणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 29 -महापालिकेतील सुरक्षा रक्षकांच्या नोकरीवर आलेली संक्रांत तात्पुरती टळली असून, ठेकेदाराच्या कंत्राटीबाबत पुढील कार्यवाही होईपर्यंत आहे त्या ठेकेदारांचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सद्यस्थितीत करार वाढविण्याला प्रशासनाने नकार दिल्याने 842 सुरक्षा रक्षकांच्या नोकरीवर गदा आली होती. ती तात्पुरती टळली आहे.
प्रशासनाने 882 सुरक्षा रक्षकांचा आणि अन्य कंत्राटी कामगारांबरोबरचा करार थांबवण्यासाठीची यादी तयार केली होती. हवालदिल झालेल्या या कर्मचाऱ्यांनी हा करार पुढे वाढवावा असे पत्र महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले होते. मात्र याबाबत काहीच होऊ शकत नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या कर्मचाऱ्यांच्या पगाराची तरतूद अंदाजपत्रकात केली नसल्याने ही कपात करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेची संपूर्ण शहरात असणारी उद्याने, रुग्णालये, क्षेत्रीय कार्यालये, पाण्याच्या टाक्‍या, जलकेंद्र, रस्त्यावरील ट्रॅफिक वॉर्डन अशा विविध ठिकाणी सुमारे 1700 कंत्राटी कामगार काम करतात. साफसफाई, अतिक्रमण कारवाईत मदत, सुरक्षारक्षक अशा विविध भूमिका त्यांच्याद्वारे बजावल्या जातात. यासाठीचा खर्च महापालिकेच्यावतीने केला जातो. प्रती कामगाराला किमान वेतन म्हणून सात हजार 200 रुपये अधिक भविष्यनिर्वाह भत्ता देण्यात येतो. वर्षभरासाठी मिळून या कामगारांची एकूण पगाराची रक्कम साधारणपणे 30 ते 32 कोटी रुपये आहे. मात्र सन 2017-18 च्या अंदाजपत्रकात या वेतनापोटी देण्याच्या रक्कमेची तरतूद केवळ 14 कोटी रुपयेच करण्यात आली आहे. त्यामुळे दिलेल्या खर्चात गणित बसवण्यासाठी 842 कामगारांना घरी बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
हा निर्णय थांबवावा यासाठी या कामगारांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना साकडे घातले होते. त्यावेळी वर्गीकरणातून निधी उपलब्ध होऊ शकतो का किंवा पुढील करार होईपर्यंत कोणालाही काढणार नाही, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका स्थायी समितीमध्ये याबाबत निर्णय घेतला असून, पुढील निविदा प्रक्रिया होईपर्यंत आहे त्या ठेकेदारांचेच काम पुढे चालू ठेवण्याचा निर्णय समितीत घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)