सुमेध गवई यांना काश्‍मीरात वीरमरण

श्रीनगर – काश्‍मीरात शनिवारी रात्री शोपिया जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जे दोन जवान शहीद झाले त्यात महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातील जवान सुमेध गवई यांचाही समावेश आहे. ते मुळचे अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा येथील रहिवासी आहेत.

सुमारे चार वर्षांपुर्वी ते लष्करात भरती झाले होते. त्यांचा याच महिन्यात 1 ऑगस्टला वाढदिवसही साजरा झाला होता. त्याचवेळी ते गावी येणार होते पण सुट्टी न मिळाल्याने ते येऊ शकले नव्हते तथापी आपण लवकरच सुट्टी घेऊन गावी येणार आहोत असे त्यांनी आपल्या कुटुंबियांना कळवले होते. त्यांचे अजून लग्नही झालेले नव्हते. त्यांचे एक बंधुही लष्करातच सेवेला आहेत.

काश्‍मीरातील शोपिया जिल्ह्यातील अवनीरा गावात एकेठिकाणी काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी जवानांनी त्या भागाला वेढा देऊन तेथे कारवाई सुरू केली होती. त्यावेळी शनिवारी रात्री दहशतवाद्यांकडून जवानांवर अचानक गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्त्युत्तर दिले. पण दहशतवाद्यांच्या गोळीबारात काही जवान जखमी झाले त्यात सुमेध गवई यांचा समावेश होता. त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले पण तेथेच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्या निधननाच्या वृत्ताने त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)