सुमारे 18 हजार रोहिंग्य मुस्लिमांचे म्यानमार मधून पलायन

बांगलादेशातील निर्मनुष्य भागात घेतला आश्रय

कॉक्‍सबजार – म्यानमार मध्ये रोहिंग्य मुस्लिमांच्या विरोधात नव्याने सुरू झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर तेथील मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात त्या देशातून पलायन सुरू केले असून सुमारे अठरा हजार जणांनी आत्ता पर्यंत बांगलादेशात प्रवेश केल्याचे वृत्त आहे.

रोहिंग्य मुस्लिमांच्या गनिमांनी म्यानमारच्या लष्करावर हल्ले सुरू केल्यानंतर लष्कराने भूमिका घेत मुस्लिम बहुल गावांमध्ये गोळीबार आणि जाळपोळ सुरू केल्यामुळे तेथील मुस्लिमांना शेजारच्या बांगलादेशात आश्रय घेण्याची वेळ आली आहे. तथापी या हिंसचाराला मुस्लिम गनिमच जबाबदार असल्याचा दावा म्यानमार सरकारने केला आहे. गेल्या रविवार पर्यंत तेथे नव्याने सुरू झालेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या शंभरावर गेली आहे.

म्यानमार हा बुद्ध बहुल देश आहे पण त्या देशाच्या राखीने राज्यात सुमारे दहा लाख मुस्लिम नागरीक वास्तव्याला आहेत. त्यांच्यातील काही गनिमी संघटनांनी पोलिसांवर आणि लष्करी जवानांवर हल्ले सुरू केल्यानंतर लष्कराने अत्यंत कठोरपणे त्यांचे हे हल्ले मोडून काढले. त्याचा फटका तेथील सामान्य मुस्लिम नागरीकांनाहीं बसला आहे. त्यातून हे पलायन सुरू झाले आहे. या आधीही सुमारे 87 हजार मुस्लिम नागरीकांनी बांगला देशात प्रवेश केला आहे.

बंगालच्या उपसागरातून बोटीतून हे निर्वासित बांगलादेशात पोहचतात. त्यांच्यापैकीच एक बोट नुकतीच समुद्रात बुडाली त्यात चार निर्वासित बुडून मरण पावल्याचे वृत्त आहे. बांगलादेशचे जवान या घुसखोरांना पुन्हा मायदेशी घालवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. काल त्यांनी यातील 171 जणांना मायदेशी परत धाडले असले तरी तेथून येणाऱ्या निर्वासितांचा लोंढा कमी झालेला नाही. हे निर्वासित पुढे भारतीय हद्दीतही घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)