सुप्रभात : ऐकावे ते नवलच..

मधुसूदन पतकी  

काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांना खडे बोल सुनावताना सल्ला ही दिला. एकूणच माध्यमांमद्दल राजकारण्यांचे मत किती चांगले असते हे अनेकदा , अनेक प्रसंगातून दिसून आले आहे. जगात पत्रकारांच्या जेवढ्या हत्या झाल्या तेवढ्या इतर कोणत्या व्यवसाय किंवा पेशातील व्यक्तींच्या झाल्या असतील असे वाटत नाही. या हत्या झाल्या त्याचे कारण बऱ्याचदा पत्रकारांनी केलेले वार्तांकन असते. असो .तर विषय होता तो दिलेल्या सल्ल्याचा.

पत्रकार विधान सभेतले किंवा विधान परिषदेतले अथवा अगदी संसदेतल्या दंग्यां बद्दल किंवा लोकप्रतिनिधींच्या गैरवर्तनाला जेवढी प्रसिध्दी देतात तेवढी प्रसिध्दी अभ्यासू चर्चा, परिसंवाद किंवा चांगल्या कामकाजाला देत नाहीत. पत्रकारांनी या सकारात्मक ,विधायक बाबींना प्रसिध्दी दिली पाहिजे असा हा सल्ला होता. नामदारांचा सल्ला नक्कीच महत्वाचा, मोलाचा आहे. चांगल्या चर्चा दाखवणे गरजेचे ही आहे. त्या दाखवल्या जात नाहीत हे वास्तव ही आहे. पण असे का होते याचा ही विचार केला पाहिजे. आणि बातम्यांच्या केंद्र भागी जी व्यक्ती असते त्यांनी तर तो अधिक गंभीरपणे केला पाहिजे.

हे म्हणण्याचे कारण , चांगले काही केले तर कोणी छापत नाही , वाहिन्यांवर दाखवत नाही म्हणून काही तरी “हटके’ केले पाहिजे हा युक्तीवद अनेकदा लोकप्रतिनिधी करतात.तर अनेकदा गदारोळा शिवाय असतेच काय; त्यामुळे नॉनइश्‍यू चे इशू करून दाखतो. छापतो, असे माध्यमे म्हणतात. गेल्या चार वर्षातल्या अभ्यासपूर्ण भाषणांचे आणि चर्चांचे पुस्तक खरेच शासनाने यापुढे नियमित काढले तर माध्यमांच्या नजरेतून जे सुटले ते मतदारांना समजेल.

आपल्याच जिल्ह्यातले एका हाताताच्या निम्या बोटांवर मोजता येतील एवढे लोकप्रतिनीधी विधान सभेत तोंड उघडतात हे वास्तव आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि बुध्दीमत्तेवर अजिबात शंका नाही. त्यांच्या लोकप्रियतेच्या आलेखावर आणि मतदारांच्या मनातील स्थानाबद्दल ही कोणालाही राग नाही.मात्र विधान सभेतील त्यांच्या भाषणाची वृत्तपत्रात मुख्य बातमी ,हेडलाईन व्हावी असे प्रसंग आठवून सांगावेत. यापूूर्वी जिल्ह्यात जे मंत्री होते ते मंत्री राज्याचे की त्यांच्या मतदार संघाचे होते असा प्रश्‍न पडावा असे त्यांचे वागणे होते.चंद्रपूर, गोंदीया या भागातून त्यांच्या कामाच्या,निर्णयाच्या , पत्रकार परिषदांच्या बातम्या आपल्या जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिध्द व्हाव्यात असे काही कधी,किती वेळा घडले ते ही सांगावे.एक काळ होता आमदार किंवा खासदार अभ्यासू होते.

मंत्री विचारी आणि तज्ज्ञ होते.त्यांची भाषणे ऐकण्यासाठी सभागृहात गर्दी व्हायची.आजही अशी काही मंडळी नक्कीच सभागृहात आहेत त्यांना प्रसिध्दिसाठी काही वेडेवाकडे करावे लागत नाही. पत्रकार कक्षात रात्री बारावाजे पर्यंत बसून तत्काली आ.विक्रमसिंह पाटणकर यांचे भाषण किंवा कृष्णा खोऱ्या संदर्भातील ना. रामराजेंचे भाषण ऐकले आहे .त्याला त्यावेळी चांगली प्रसिध्दी ही दिली आहे. मात्र मुळ आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? मग ज्याकरता मतदारांनी लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी तिथे नेमून दिलेले काम केले; ते त्यांनी केल्याच्या बातम्या देण्याचा सल्ला कितपत संयुक्तीक आहे.

डॉक्‍टरांनी चांगले तपासले, गुरुजींनी चांगले शिकवले, मुलाबाळांनी आईवडिलांना सांभाळले या अनिवार्य कर्तव्याच्या जर बातम्या व्हायला लागल्या तर नामदार म्हणातात तसे लोकप्रतिनिधींच्या चांगल्या कामाच्या बातम्या वृत्तपत्रांनी प्रसिध्द केल्या पाहिजेत.जनतेने त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपल्याला निवडून दिले आहे, आणि ते आपल्या कर्तव्य आहे ही भावना संपुष्टात आली असेल तर त्यांच्या गैरर्वनापेक्षा कर्तव्यपूर्ततेच्या बातम्या प्रसिध्द केल्याच पाहिजेत.आणि नवलानी पाहिल्या,वाचल्याच पाहिजेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)