सुपे घाटातून चोरट्यांनी गव्हाचा ट्रक पळवला

यवत- दौंड तालुक्‍यातील पडवी गावच्या हद्दीत असलेल्या शिरूर-सातारा राज्य मार्गावरील सुपे घाटात गव्हाची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला डांबून ठेऊन अज्ञात चोरट्यांनी ट्रक पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि. 27) सायंकाळच्या सुमारास घडली. 31 टन गहू, मालवाहू ट्रक तसेच दोन मोबाईल असा एकूण 16 लाख 93 हजार किंमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

या प्रकरणी ट्रक चालक रामप्रसाद बद्रीलाल राठोड (वय 56, डुंगरगाव अस्तनावत, जि. झालावर राजस्थान) यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (आर. जे. 17, जी. ए. 6728) हा ट्रक पडवी गावच्या हद्दीतील सुपा घाटाच्या पहिल्या वळणावर आला असता नंबर प्लेट नसलेल्या वॅगनार कारमधून आलेल्या चौघा आरोपींनी आपली कार ट्रकला आडवी लावली. यावेळी चोरट्यांनी ट्रक चालक रामप्रसाद राठोड व नंदलाल ठाकूर या दोघांना कारमधून पळवून नेवून डांबून ठेवले व गव्हाने भरलेला ट्रक पळवून नेला. ट्रक व गव्हाची एकूण किंमत 16 लाख 93 हजार रुपये इतकी आहे. यवत पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)