सुपा परिसरात रिमझिमने पिकांना जीवदान

सुपा – पारनेर तालुक्‍यातील सुपा जिरायती पट्ट्यात चार ते पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीला लागणाऱ्या पाण्याची टंचाई मात्र अजूनही कायम आहे.

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुपा परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसावर शेतकऱ्यांनी मूग, बाजरी, तूर, हुलगा, मठ, कांदा तसेच जनावरांसाठी मका, कडवळ, घास पिके घेतली. हवामान खात्याने दिलेल्या सरासरीपेक्षा जास्त पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये पिके जोमाने येण्याची आशा होती. आर्थिक ताण सहन करत कांदा, मूग बियाण्यांची चढ्या भावाने खरेदी शेतकऱ्यांनी केली. शेतात पेरणी केली. त्याची उगवणही चांगल्या प्रकारे झाली. परंतु, दीड महिन्याचा कालावधी होऊनही पावसाने दडी मारल्याने विकत घेतलेले बियाणे वाया जाते की काय? अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये होती. परंतु, गुरुवारपासून दिवसातून दोन-चार वेळा पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोमेजलेल्या पिकांना या सरींचा लाभ मिळत आहे. सुपा परिसरात हंगा, शहाजापूर, वाघुंडे, म्हसणे, जातेगाव, घाणेगाव, पळवे, कडूस, भोयरे गांगर्डा, बाबुर्डी, रुईछत्रपती, वाळवणे, पिंप्री गवळी, रांजणगाव मशिदी, रायतळे, अस्तगाव या गावांमध्ये खरीप हंगामातील मुगाची विक्रमी पेरणी करण्यात आली आहे. सर्वात कमी खर्चाचे, कमी मेहनतीचे बोनस पीक म्हणून मूग या पिकाची ओळख आहे. निसर्गाने साथ दिली तरच शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)