सुपा परिसरात रब्बी हंगाम धोक्‍यात 

पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संकट
सुपा – नेहमी दुष्काळाशी सामना करावा लागत असलेल्या पारनेर तालुक्‍यासह सुपा परिसरात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम तर वाया गेला मात्र रब्बी हंगाम देखील धोक्‍यात आल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
सुपा परिसरातील जिरायती पट्टा हा पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. यावर्षी हवामान खात्याचा अंदाज सपशेल फेल ठरल्याने तसेच एकामागून एक नक्षत्र कोरडे जावू लागल्याने बळीराजापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
खरीप हंगामात अल्प पावसावर या भागात मोठ्या प्रमाणात मुगाची पेरणी करण्यात आली. मात्र पावसाअभावी उभ्या पिकात पाळी घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. कमी कष्टात व बोनस म्हणून शेतकऱ्यांच्या पदरी पडणारे हे पिक वाया गेले. या दरम्यान मुलांचा शैक्षणिक खर्च, कुटुंबाचा खर्च पेलवतांना बळीराजाची अर्थिक घडी विस्कटली.
श्रावणी पोळा झाल्यानंतर परिसरात हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या दरम्यान शेतकऱ्यांनी कोरडयात मोठ्या प्रमाणावर कांदा लावगड केली, तर काहींनी कांदयाच्या बीयाची पेरणी केली. कोरड्यात लावलेल्या कांदयाला पाणी न मिळाल्याने तीव्र उन्हात हा कांदा होरपळू लागला आहे, तर पेरलेल्या कांदयाची उगवणच खुंटली. पेरलेल्या कांदयाला पाळी घालून यामध्ये ज्वारीची पेरणी केली.
हस्त, चित्रा, स्वाती ही पर्जन्य नक्षत्रातील शेवटची तीन नक्षत्रे आहेत. या तीन नक्षत्रांमध्ये पाऊस हा परतीला लागलेला असतो. काल 10 ऑक्‍टोंबर पासून चित्रा हे नक्षत्र व शेवटी स्वातीचे नक्षत्र बाकी आहे. या नक्षत्रावर रब्बी हंगामाची मदार अवलंबून असणार आहे. खरीपापाठोपाठ रब्बीबाबत देखील साशंकता व्यक्त केली जात आहे. तालुक्‍यात ऐन पावसाळ्यात सुमारे 15 गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. परतीच्या पावसाने ही हुलकावणी दिल्याने पावसावर अवंबुन असलेले शेतकऱ्यांचे मुख्य पिक ज्वारी व त्यातून जनावरांसाठी वर्षभर पुरणारा चारा उपलब्ध होणार नसल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. या परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये तरुण वर्गाने कर्ज काढू हा व्यवसाय सुरू केला. मात्र दर वर्षी पावसाच्या अवकृपेने हा दुध व्यवसायच अडचणीत सापडत आहे.
यावर्षी तालुक्‍यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली आहेत, मात्र पाऊसच न झाल्याने बंधाऱ्यामध्ये पाणी आले नाही. भर पावसाळ्यात विहीरींनी तळ गाठला असून बोरवेलला देखील पाणी आले नाही. यामुळे चालू वर्षी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

दुष्काळ जाहिर करून चारा छावण्या सुरू कराव्यात !
खरीप हंगामासह रब्बीतील ज्वारीचे पीक पाण्याअभावी करपू लागली आहेत. ऑक्‍टोबर महिना निम्मा सरत आला तरी परतीच्या पावसाची आशा मावळत चालली आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी भोयरे गांगर्डाचे सरपंच भाऊसाहेब भोगाडे, वाळवणेचे सरपंच उत्तमराव पठारे, कडूसच्या सरपंच पुनमताई मुंगसे, बाबुर्डी च्या सरपंच आशा दिवटे, वाघूंड्याचे सरपंच संदीप मगर यांनी केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)