मुंबई : भव्यदिव्य आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा शरीरसौष्ठवपटूंचा मुकाबला आणि मुंबईकर प्रेक्षकांनी भरभरुन दिलेली दाद… महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच विजेतेपदाचा ‘पंच’ मारला. सलग पाचव्यांदा ‘महाराष्ट्र श्री’चा किताब पटकवण्याचा मान सुनीतने मिळवला. विजेत्या सुनीतला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह रॉयल एनफिल्ड देऊन गौरवण्यात आले.
जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारे महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर यांच्यावर मात करत सुनीतने सलग पाचव्यांदा राज्य अजिंक्यपद राखलं. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवले, तर फिजीक स्पोर्ट्स प्रकारामध्ये पुणेकरांनी बाजी मारली. पुरुषांमध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे विजेती ठरली. मुंबईने सांघिक विजेतेपदावर तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला.
शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीतील फुललेलं पीळदार सौंदर्य पाहिल्यानंतर रविवारची अंतिम फेरी ब्लॉकबस्टर होणार, याचा अंदाज बांधला जात होताच. मुंबईत वांद्रे पूर्वेला असलेलं पीडब्ल्यूडी मैदान संध्याकाळी पाच वाजताच खचाखच भरलं होते. कृष्णा (महेश) पारकर यांनी अभिनव फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने शरीरसौष्ठवाचा राज्य सोहळा साकारला होता. अंतिम लढतीत सुनीत हा महेंद्र चव्हाण आणि अतुल आंब्रेवर मात करुन सलग पाचव्यांदा बाजी मारणार, हा विश्वास जमलेल्या बहुसंख्य प्रेक्षकांच्या जयघोषातून जाणवत होता.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा