सुदवडी येथे मोकाट कुत्र्यांनी 19 शेळ्या-मेंढ्यांचा फडशा पाडला

  • इंदोरी परिसरात देखील भटके व मोकाट कुत्र्यांमुळे नागरीक त्रस्त

इंदोरी, (वार्ताहर) – सुदवडी येथे 15 ते 20 मोकाट कुत्र्यांनी शेळ्या-मेंढ्यांच्या फार्मवर हल्ला केला. यामध्ये 19 शेळ्या-मेंढ्या जागीच मरण पावल्या असून नऊ शेळ्यांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवार दि. 28ला पहाटे घडली.

भंडारा डोंगराच्या मागच्या बाजूला असलेल्या सुदवडी गावात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी प्रचंड हैदोस घातला आहे. पहाटे 15 ते 20 मोकाट कुत्र्यांनी सुदवडी येथील रेनबो फार्मवर हल्ला केला. फार्मच्या कडेला संरक्षक तार कुंपण आहे. तसेच संरक्षक सिमेंटची भिंत देखील आहे. कुत्र्यांनी त्यावरून उड्या मारून शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला केला.
शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला होत असताना कुत्र्यांना हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या माणसांच्या अंगावर देखील कुत्रे धावून आले. हल्ल्यात शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाला, गळ्याला चावा घेतल्याने 19 शेळ्या-मेंढ्या जागीच मृत झाल्या. नऊ शेळ्या-मेंढ्या अत्यवस्थ आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील मोकाट कुत्रे पकडून भंडारा डोंगराजवळ सोडत असल्याचे गावकरी सांगतात.

काही दिवसांपूर्वी सुदवडी परिसरातील एका वासरावर हल्ला झाला होता. माणसांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या कुत्र्यांमध्ये काही पिसाळलेली कुत्रीही आहेत. अशा कुत्र्यांचा लहान मुलांना मोठा धोका आहे. महापालिका प्रशासनाने यावर योग्य कारवाई करून कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करायला हवा, अशी इंदोरी भंडारा डोंगर परिसर सुदवडी ग्रामस्थांची मागणी आहे.

प्राण्याची हत्या करण्यास बंदी आहे. मात्र मोकाट आणि मानवी जीवनास धोका पोचवणाऱ्या कुत्र्यांचा नाश करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. केरळ आणि मुंबई उच्च न्यायालयाने मोकाट पण जीवितास धोका पोचवणाऱ्या कुत्र्यांना ठार मारण्यास अनुमती दिली होती. त्यानंतर काही प्राणी मित्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याबाबतचा निकालही मागील वर्षी लागला आहे. उच्च न्यायालयाचा निकाल कायम करत सर्वोच्च न्यायालयाने पिसाळलेल्या आणि मानवी जीवितास धोका पोचवणाऱ्या कुत्र्यांना ठार मारण्यास परवानगी दिली आहे.

इंदोरी येथील भंडारा डोंगर पायथा तळेगाव-चाकण मार्ग या ठिकाणी भटक्‍या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, असे दिसून येत आहेत. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे नाजीक असलेले हॉटेल, ढाबे आहेत. या ठिकाणी खाण्या-पिण्याची सोय आहे. भटक्‍या कुत्री नागरीक आणि वाहन चालकांना त्रस्त करीत आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी दुचाकी स्वारांचे अपघात येथे घडत आहेत.

ठिकठिकाणी रस्त्यावर आणि उघड्यावर टाकले जाणारे शिळे अन्न या कुत्र्यांना पूरक ठरत आहे. गेले काही वर्षे या ठिकाणी कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कोणतीही उपाय-योजना करण्यात येत नसल्याने या परिसरात कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार नागिरकांनी केली आहे.

याचबरोबर कुत्र्याचे नि:बिजीकरण हा सोपा उपाय आहे. रात्री फिरणे किंवा वाहन चालवणे कठीण बनले आहे. कुत्री रस्त्यामध्येच बसलेली असतात. दुचाकीस्वारांना याचा अनेकदा फटका बसतो. अचानक दुचकीस्वारांसमोर कुत्री आल्यावर लहान मोठे अपघात घडलेत. मोठ्या वाहनांच्या धडकेत कुत्री मरतात. कुत्र्यांना चुकवताना अनेकदा छोट्या वाहनांचे अपघात देखील होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)