सुगंधी तंबाखूची छुपी वाहतूक उधळली ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

 45 लाखांचा माल जप्त, नगरच्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा

नगर: नगर-पुणे महामार्गावर ट्रकमधून वाहतूक करण्यात येणारी सुमारे 44 लाख 46 हजार 400 रुपयांची सुगंधी तंबाखू अन्न व औषध प्रशासनाने मोठ्या शिताफीने कारवाई करत ताब्यात घेतली. ट्रक चालक शेख नाजीर बाबा (रा. घर क्रमांक 616, झेंडीगेट, नगर) याच्याविरोधात अन्न व औषध अधिनियमातील तरतुदींनुसार सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी कालीदास शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त किशोर गोरे (अन्न) यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. नगर-पुणे महामार्गावरून वाहनांद्वारे सुगंधी तंबाखूची वाहतूक होणार आहे. नाशिक विभागाचे सह आयुक्त सी. डी. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी कालीदास शिंदे, नाशिकचे अन्न व सुरक्षा अधिकारी नीलेश धुंदाळे, नमुना सहायक पी. सी. कसबेकर यांनी नगर-पुणे महामार्गावर ही कारवाई केली. पुणेहून नगरच्या दिशेने येणारा ट्रक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला.

या ट्रकाची तपासणी केल्यावर त्यात सुगंधी तंबाखू आढळली.अन्न सुरक्षा अधिकारी शिंदे, धुंदाळे व कसबेकर यांनी मोजदाद केली. त्याची किंमत सुमारे 44 लाख 46 हजार 400 रुपये एवढी भरली. ट्रक चालक हा झेंडीगेट येथील शेख नाजीर बाबा याला ही सुगंधी तंबाखू नेमकी कोठे घेऊन जायचे हे सांगता येत नव्हते. शिंदे यांनी सुपे पोलीस ठाण्यात ट्रक चालक शेख नाजीर याच्याविरोधात अन्न व औषध अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला आहे.

मध्यरात्रीपासून कारवाईसाठी “फिल्डिंग’

सहायक आयुक्त किशोर गोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सह आयुक्त सी. डी. साळुंके यांच्याशी चर्चा केली. ट्रक कोणता हे निश्‍चित नव्हते. ट्रकचा क्रमांक देखील अर्धवटच होता. तरी देखील हा ट्रक कोणत्याही परिस्थिती पकडायचाच, अशी तयारी अन्न व सुरक्षा अधिकारी यांनी केली होती. गोरे यांनी अन्न सुरक्षा अधिकारी कालीदास शिंदे यांच्याशी चर्चा केली. सह आयुक्त साळुंके यांनी कारवाईसाठी गोरे व शिंदे यांच्या मदतीला नाशिकचे अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश धुंदाळे यांना दिले.

या पथकाने नगर-पुणे रोडवर गुरूवारच्या मध्यरात्रीनंतर दोन वाजता कारवाईसाठी “फिल्डिंग’ लागली. थंडी वाढत होती. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रकचा क्रमांक अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटलेला नव्हता. शुक्रवारच्या पहाटेची थंडी वाढत असतानाच अधिकाऱ्यांनी काहीशी आशा सोडून दिली होती. परंतु खबर पक्की असल्याने अधिकारी ठाम राहिले. अधिकारी सुपे येथील परिसरात टपरीवर सकाळी नऊच्या सुमारास फ्रेश झाले. तेवढ्यात खबऱ्याचा संपर्क झाला. अधिकाऱ्यांनी पुन्हा महामार्गावरील वाहनांच्या क्रमांकावर लक्ष केंद्रीत केले. खबऱ्याच्या माहितीनुसार ट्रक अधिकाऱ्यांच्या नजरेच्या टप्प्यात आला आणि तो त्यांनी प्रवासी म्हणून थांबविला. अन्न व औषध प्रशासनाने हा ट्रक सील केला असून, त्याची किंमत 10 लाख रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)