‘सुकन्या’ योजना ‘समृद्ध’ होणार का ?

व्यंकटेश भोळा 

पुणे क्षेत्रीय डाक विभागात 2 लाख 4 हजार मुलींची उघडली खाती


दोन वर्षांतील आकडेवारी पाहाता आणखी जनजागृतीची गरज


योजनेंतर्गत गुंतवणूक केलेल्या रकमेस 8.1 टक्‍के व्याजदर

पुणे – मुलींच्या शैक्षणिक भवितव्यासाठी व आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत पुणे क्षेत्रीय डाक विभागाकडून आतापर्यंत 2 लाख 4 हजार मुलींच्या पित्यांनी खाते उघडली आहेत. मुलींच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या योजनेस मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

 

सुकन्या समृद्धी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, ही आमच्या दृष्टीने समाधानकारक आकडेवारी आहे. त्याचप्रमाणे या योजनेबाबत गावोगावी व मेळावा घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती डाक कार्यालयाकडून केली जात आहे. मुलींच्या शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या ही योजना उपयुक्‍त असून, त्यासाठी योजनेचा लाभ घ्यावा. – एफ. बी. सय्यद, सहायक पोस्ट मास्टर जनरल

मुलींचा जन्मदरही घसरला आहे. स्त्रीभ्रूण हत्या प्रमाण आजही कायम आहे. या प्रकाराने अनेक गंभीर समस्या देशासमोर उभ्या होत्या. यावर उपाययोजना म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना, कायदेही तयार करण्यात आले. परिणामी, थोडाफार बदल दिसून आला, मात्र समस्यांचा डोंगर उभाच आहे. या समस्येमुळे देशाच्या विकासावर विपरीत परिणाम होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा नारा देत त्यांनी “समृद्ध बालिका देश का भविष्य’ ओळखून सुकन्या समृद्धी योजना 21 जानेवारी 2015 रोजी सुरू केली. त्यास पहिल्या दोन वर्षांत प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मात्र गेल्या दोन वर्षातील आकडेवारी पाहाता, या योजनेसाठी जनजागृती होण्याची गरज आहे. सध्या योजनेंतर्गत गुंतवणूक केलेल्या रकमेस 8.1 टक्‍के व्याजदर आहे.

पुणे, नगर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे क्षेत्रीय डाक विभागात आतापर्यंत दोन लाख मुलींच्या पालकांनी खाते उघडून आपल्या मुलींचे भविष्य समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक पालकांनी केली आहे. योजना सुरू झाली, त्याच्या दोन-अडीच महिन्यात तब्बल 57 हजार खाते उघडण्यात आली. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात 75 हजार 886 खाते उघडले गेले. त्यानंतर मात्र गेल्या दोन वर्षात ही योजनेतून खाते सुरू करण्याचे प्रमाण 35 हजारांवर स्थिरावली आहे, अशी माहिती पुणे विभागीय डाक कार्यालयाकडून देण्यात आली.

सुकन्या योजनेची वैशिष्ट्ये :
जन्मापासून ते 10 वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
एका मुलीच्या नावे एकच खाते सुरू करता येईल.
एक हजार रुपये भरून खाते सुरू करता येते
वर्षभरात किमान एक हजार ते दीड लाखापर्यंत रक्‍कम जमा करता येईल
या रकमेवर 80-सी अंतर्गत आयकरात सूट
21 वर्षांपर्यंत खाते सुरू राहणार
वयाच्या 18 व्या वर्षी निम्मी रक्‍कम काढता येते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)