सुंभ जळाला पण पोळ नाही सुधारला

 

प्रशासनासह साक्षीदारांवर दबाव टाकण्यासाठी खेळी ? संतोष पोळने कुणाच्या सल्ल्याने रचला बनाव?

प्रशांत जाधव

सातारा, दि. 28 – सुंभ जळाला पण पीळ नाही या म्हणीचा अर्थ सध्या सातारा जिल्ह्यासह अवघा महाराष्ट्र घेताना दिसतो आहे. वाई तालुक्यातील धोम गावचा कथीत डॉक्टर अन् तब्बल सहा महिलांचा खुनी संतोष पोळ जेलच्या गजाआडसुध्दा शांत नाही. प्रशासनाला कोणत्या ना कोणत्या कारणाने वेठीस धरणारा पोळ जेलमध्ये गेल्यावर तरी सुधारेल ही त्याच्या कुटुंबांची भोळी आशा सपशेल फोल ठरत आहे. कोल्हापूर कारागृहातही त्याने मोबाईल,पिस्टल आत नेत जेल प्रशासनाची झोप उडवली . त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली तरी त्याची खोड काही केल्या जात नाही, असेच म्हणावे लागेल.

संतोष पोळ नाव घेतले तरी आजही त्याच्या क्रौर्याने धडकी भरते. जोपर्यंत पोळची सगळी काळी कृत्ये समाजासमोर आली नाहीत; तोपर्यंत पोळ हा धोम भागातील एक नावाजलेला डॉक्टर होता. सामान्य लोकांसह प्रशासनात त्याचा चांगला राबता असायचा. याच राबत्यातून त्याने प्रशासनाचे कच्चे दुवे शोधले अन् सुरू झाला ब्लॅकमेल करण्याचा धंदा ! ब्लॅकमेल केले की यंत्रणा कचरते हे लक्षात येताच पोळने त्याचे उपद्रव मुल्य वाढवण्यास सुरूवात केली.

त्यातूनच धोमच्या कड्या, कपारीत निरपराधांच्या रक्ताच्या चिळकांड्या आन् किंचाळ्या उमटल्या. एक एक करून सहा लोकांचे मुडदे या नराधमाने पाडले. मात्र पोलिसांच्या दप्तरी त्या सहा मृत व्यक्ती कायम तापासावरच राहिल्या. पोळच्या भितीने कायम गॅसवर असणार्‍या यंत्रणेकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार. मात्र खुदा के घर देर है लेकीन अंधेर नही; मंगला जेधेंच्या खुनानंतर पोळच्या पापाचा घडा भरला. त्याने कायम तपासावर असणार्‍या पोलिसांची झोप उडाली.

पोलिसांनी पोळला ताब्यात घेतला. त्यानंतर या नराधमाने मंगला जेधे, नथमल भंडारी, सलमा शेख, जगाबाई पोळ, वनिता गायकवाड, सुरेखा चिकणे असा खुनाचा पाढाच पोलिसांच्यासमोर वाचला. खुनप्रकरणाच्या अटकेपुर्वी एका वॉरंटमध्ये पोळला पकडण्यासाठी वाई पोलिस गेले, त्यावेळी  पोळने स्वःताच्या अंगावर ब्लेडने वार करून पोलिसांनी ते वार केल्याचा बनाव केला. तत्कालीन पोलिस अधिकार्‍यांच्या समयसुचकतेमुळे त्याचा हा बनाव उघड झाला.  मात्र खुन प्रकरणाच्या अटकेनंतर पोलिसांचा खाक्या आणि जेलची हवा यामुळे सुधरेल असा वाटणारा पोळ पहिल्यांदा सातारा कारागृहातही आपले कारनामे करू लागला. त्यामुळे त्याची रवानगी कळंबा कारागृहात केली. तिथेही पोळने उपोषण करत प्रशासनावर गंभीर आरोप करण्याची मालिका सुरूच ठेवली. सातार्‍याची स्थानिक गुन्हे शाखा तसेच वाई पोलिस ज्योती मांढरेला माफीचा साक्षीदार होण्यासाठी दबाव टाकत असल्याची कागाळी त्याने केली.

या आरोपामुळे प्रशासनावर काहीच फरक पडला नाही. म्हणून पोळने कळंबा कारागृहात खोट्या पिस्टलचा खरा व्हिडीओ व्हायरल करून अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजवली. यामुळे कारागृह प्रशासन चौकशीच्या फेर्‍यात अडकेल. कोणाच्या तरी नोकरीवर गदा येईल. पण हा व्हिडीओ कुणाच्या सल्ल्याने तसेच मदतीने बनवून बाहेर पाठवला याचा तपास करण्याची आवश्यकता आहे. पोळने कारागृह प्रशासनाला वेठीस धरण्याबरोबर खुन खटल्यातील साक्षीदारांच्यावर दबाव टाकण्यासाठीच ही खेळी केली आहे; असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे यातील खरी मेख ओळखत पोळच्या या प्लॅनला चेकमेट करण्याचे मोठे आव्हान सातारा पोलिसांसमोर आहे.

मोबाईल की स्पाय कॅमेरा?
पोळने चित्रीत केलेल्या व्हिडीओत दिसणारे पिस्टल बनावट असल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला आहे. मात्र मोबाईल आत कसा आला या प्रश्नामुळे पुन्हा करागृह प्रशासन शंकेच्या केंद्रस्थानी आहे. पोळने वापरलेला कॅमेरा हा मोबाईलचा होता की स्पाय कॅमेर्‍याचा याच शोध घेणे गरजेचे आहे.

पोळला नक्की कुणाचा सल्ला आणि मदत
संतोष पोळने केलेल्या कृत्यामुळे आजही जिल्ह्यात त्याच्याबद्दल समाजात संताप आहे. असे असताना कारागृहात व्हिडीओ चित्रीत करण्यासाठी कॅमेरा कुणी दिला. चित्रीत केलेला व्हिडीओ कुणाच्या मदतीने बाहेर आला? यासह हे सगळे नाटक त्याने कुणाच्या सल्ल्याने रचले ? याचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे.

…व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज चालवले तर?
शासनाचा होणारा वायफळ खर्च कमी करण्यासाठी राज्यातील बहुतेक कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कैद्यांच्या केसेस चालवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा उपयोग करत संतोष पोळसारख्या लोकांचे खटले चालवले तर या गोष्टी नक्कीच टाळता येतील. अन पोलिस प्रशासनावर येणारा आरोपींना ने आण करण्याचा ताण कमी होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
31 :thumbsup:
11 :heart:
8 :joy:
5 :heart_eyes:
4 :blush:
4 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)