सीरियावरील कारवाईबाबत ब्रिटन आणि फ्रांसशी चर्चा करून निर्णय घेणार

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे प्रतिपादन
वॉशिंग्टन – सीरियातील सत्ताधाऱ्यांनी आपल्याच देशातील आंदोलकांवर रासायनिक अस्त्रांचा जो वापर केला आहे त्याबाबत सीरियावर लष्करी कारवाई करण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या आधीच दिला आहे. पण ही कारवाई कधी करायची यावर आपण ब्रिटन आणि फ्रांसशी चर्चा करून निर्णय घेऊ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
व्हाईट हाऊस मध्ये सध्या सीरियावर कारवाई करण्याबाबत बैठकांची सत्र सुरू आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्या सारा सॅंडर्स यांनी सांगितले की अध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतीच आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पथकाशी चर्चा केली. त्यात हल्ल्याबाबतचा अंतिम निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.

आज दिवसभरात अध्यक्ष ट्रम्प हे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि फ्रांसचे अध्यक्ष इमॅन्युएल मारकॉन यांच्याशी चर्चा करतील आणि हल्ल्याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. या कारवाई बाबत अध्यक्ष ट्रम्प हे सध्या आपल्या मित्र राष्ट्रांशी सातत्याने चर्चा करीत आहेत असे त्यांनी सांगितले. स्वत: ट्रम्प यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी या स्थितीवर अगदी सातत्याने लक्ष ठेऊन आहे.

आम्ही निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत आता पाहुया काय होते ते असे त्यांनी बैठकीला जाण्यापुर्वी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की आम्ही इसिसच्या बाबतीत अत्यंत चांगली कामगीरी केली आहे. त्यांना आम्ही नेस्तानबुत केले आहे आता आम्हाला आणखी मोठे काम करायचे आहे असेही ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दरम्यान ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सीरियावरील लष्करी कारवाईला हिरवा कंदील दाखवला आहे असे वृत्त लंडनहून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)