सीबीएसईचे दहावी व बारावीचे दोन पेपर परत होणार

मंडळाचा निर्णय: दहावीचा गणित तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर

– विद्यार्थी निराश तर पालक संतप्त
– बाहेरगावचे बुकींग रद्द करावे लागणार
– अकारण मनस्तापाचा करावा लागतोय सामना

पुणे,दि.28 – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या असे म्हणायच्या आतच लगेचच मंडळाने दहावीचा एक तर बारावीचा एक असे दोन पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र देशाच्या एखाद्या छोट्या ठिकाणी फुटलेल्या पेपरमुळे देशातील दहावी व बारावीच्या जवळपास 28 लाख विद्यार्थ्यांना वेठीस का धरले जात आहे असा प्रश्‍न पालक व विद्यार्थी विचारत आहेत.
मंडळाने यासाठी एक परिपत्रक जाहीर करुन माहिती दिली आहे. यामध्ये पेपरफुटी झाली अशी स्पष्ट कबुली दिली नसली तरीही काही घडलेल्या घटना पहाता आम्ही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हे दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. या नव्याने घेण्यात येणाऱ्या पेपरचे वेळापत्रक आठवडाभरात सीबीएसईच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. दहावीचा गणिताचा पेपर 28 मार्चला झाला होता. तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर 26 मार्चला घेण्यात आला होता. दहावीचे मुख्य विषय पूर्ण झाले असून बहुतांशी विद्यार्थ्यांची आज परीक्षा संपली होती तर काही विद्यार्थ्यांचे पेपर अजुनही सुरु असून त्यांची परीक्षा 4 एप्रिलच्या पेंटींगच्या पेपरनंतर संपणार आहे. तर बारावीची परीक्षा 13 एप्रिलपर्यंत सुरु असणार आहे. नुकत्याच झालेल्या या पेपरमुळे विद्यार्थी परीक्षा संपली म्हणून अत्यंत आनंदात होते. मात्र या आनंदावर घरी येईपर्यंतच विरजन पडलेले पहायला मिळाले.
दरम्यान काही पालकांनी परीक्षांनंतर संपूर्ण कुटुंबासह बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता त्यांना तो रद्द करावा लागणार असल्याचे दिसत आहे. पालक म्हणाले, दहावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने वर्षभर आम्ही काहीही सेलिब्रेशन केले नव्हते. म्हणूनच परीक्षा संपल्यावर आता आम्ही सर्वजण बाहेरगावी सेलिब्रेशनसाठी जाणार होतो. त्यासाठी विमानाचं, हॉटेलचं, तेथील ऍक्‍टीव्हीटींचे बुकींग केले होते पण पेपर पुन्हा घेणार असल्याने आता सर्वच गोष्टी रद्द होणार व आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार. त्यातच पुढील पेपर कधी असणार याचीही माहिती न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे एकूणच एप्रिल महिन्यांचे संपूर्ण गणितच कोलमडले आहे.

पेपर पुन्हा घेणार असल्याची बातमी ही अत्यंत वाईट आहे. आम्ही आता पेपर देऊन घरी येतो तोच आता आम्हाला पेपर पुन्हा होणार असल्याची बातमी कळाली. मात्र दिल्लीच्या एखाद्या ठिकाणी झालेल्या घटनेसाठी आम्हाला सर्वांना का शिक्षा द्यायची. आम्ही इतके दिवस केलेली मेहनत का वाया घालवाची? आमच्यातील अनेकांनी एप्रिल महिन्यात कोणत्या न कोणत्या परीक्षा देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या प्रवेश परीक्षाही एप्रिलमध्येच आहे मात्र आता सर्वच गोष्टी फसणार असल्याचे चित्र आहे.
– हिना कपूर, बारावीची विद्यार्थिनी
दिल्ली पब्लिक स्कूल

आत्ता कुठे आम्ही पेपर देऊन निवांत झाले तोच मंडळाने पुन्हा परीक्षा देण्यास सांगणे हे अत्यंत चुकीचे आहे. आधीच आमचा संपूर्ण महिना हा परीक्षांमध्ये गेला आहे आता आम्हाला दुसराही महिना परीक्षा द्यावी लागणार. ती परीक्षा कधी होणार हे तरी मंडळाने लवकरात लवकर स्पष्ट करायला हवे.
सोहन जोशी, दहावीचा विद्यार्थी
पोतदार इंटरनॅशनल स्कूल


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)