“सीबीआय’च्या घाटावरची धुणी (अग्रलेख)

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामध्ये (सीबीआय) सध्या जी चिखलफेक सुरू आहे, त्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या अधिकाऱ्यांवर मेहेरनजर दाखविली, त्यांनीच मोदी यांना गोत्यात आणले आहे. मोदी यांनी गुजरात केडरचे पोलीस अधिकारी राकेश अस्थाना यांची सीबीआयवर थेट नियुक्‍ती केली. त्या नियुक्‍तीला संचालक आलोककुमार वर्मा आणि सहसंचालक ए. के. शर्मा यांनी तीव्र आक्षेप घेतला होता; मात्र तरीही ही नियुक्‍ती झाली. अस्थाना यांच्या नियुक्‍तीशी थेट मोदी यांचाच संबंध असल्याने राजकीय वर्तुळातही हालचालींना वेग आला आहे. अस्थाना यांनी त्यांच्याविरोधातील कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. अस्थाना आणि देवेंदर कुमार या दोघांनी आपल्याकडील सर्व पुरावे तसेच मोबाइल संभाषणाविषयीचे पुरावे सुरक्षित राखावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

सीबीआय स्वायत्त संस्था आहे. तिने नियामकाप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे; परंतु सीबीआयचा वापर जसा विरोधकांची जिरवण्यासाठी केला जात होता, तसाच तो आताही होतो आहे. सीबीआयची विश्‍वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळेच
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयची संभावना “पिंजऱ्यातला पोपट’ अशी केली होती. त्यातून सुधारणा होण्याऐवजी सीबीआय अधिकाधिक गर्तेत जात राहिली. आता तर सीबीआयमधील सर्वोच्च प्रमुख आणि दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी यांच्यातच आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाली आहे. दोन वरिष्ठ अधिकारी परस्परांचेच वस्त्रहरण करीत आहेत. त्यामुळे या संस्थेची उरलीसुरली अब्रू व विश्‍वासार्हता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अस्थाना यांच्यावर हैदराबादचे उद्योगपती सतीश साना यांच्याकडून तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप झाला. तसा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अस्थाना यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाही अटक झाली आहे; परंतु हा सारा प्रकार आपल्या विरोधातील गटाचा बनाव असून, प्रत्यक्षात सीबीआयचे संचालक वर्मा यांनीच लाच घेतल्याचा आरोप अस्थाना छातीठोकपणे करीत आहेत. वर्मा यांच्याविरोधात तर दहा गंभीर आरोपांची यादीच अस्थाना यांनी कॅबिनेट सचिवांकडे दिली आहे. सीबीआयचे दोन प्रमुख अधिकारीच परस्परांवर कोट्यवधीची लाच घेतल्याचा आरोप करतात, तेव्हा या संस्थेच्या कारभाराबद्दलच प्रश्‍न उपस्थित होतो. अस्थाना हे सध्या दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी असले, तरी पहिल्या क्रमांकासाठी त्यांची धडपड सुरू आहे. तेव्हा या वादाला अंतर्गत स्पर्धेचाही पदर आहे.

विजय मल्ल्या, ऑगस्टा वेस्टलॅंड आदी महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास अस्थाना यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. अशा अधिकाऱ्यावरच लाच घेतल्याच्या आरोपाचे सावट असेल, तर त्यांच्याकडील महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासाचे काय होणार? अधिकारीच एकमेकांची लफडी बाहेर काढण्यात गुंतले असतील, तर त्यांचे गुन्हेगार पलायन आणि गुन्ह्यांकडे लक्ष कसे असेल? कोळसा गैरव्यवहारातील आरोपी सीबीआयच्या तत्कालीन संचालकांच्या घरी वारंवार पायधूळ झाडत असल्याची माहिती न्यायालयापुढे आली होती. मोदींनी “न खाऊँगा, न खाने दुँगा’ असे सांगून सत्ता हस्तगत केली; परंतु देशात भ्रष्टाचाराची पाळेमुळे अजूनच भक्कम झाली आहेत. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून मोदी यांनी देशभर स्वच्छता मोहीम हाती घतली आहे; परंतु या मोहिमेपेक्षाही वेगळ्या स्वच्छता अभियानाची खरी गरज आहे. आता वर्मा आणि “रॉ’च्या प्रमुखांना मोदी यांनी बोलावून, अस्थानाप्रकरणी चर्चा केली आहे. त्यामुळे तर मोदी हे अस्थाना यांच्या चौकशीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करण्याची संधी कॉंग्रेसला मिळाली.

नीना सिंह (संयुक्‍त संचालक, गुन्हे), अनीस प्रसाद (डीआयजी), के. गोपालकृष्णन राव (पोलीस अधीक्षक) हे सीबीआयमध्ये असताना नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी व रायन पब्लिक स्कूलसह सगळया संवेदनशील प्रकरणांची चौकशी करीत होते. या अधिकाऱ्यांना घाईघाईने सीबीआयमधून दूर करून आपल्या आवडीच्या; परंतु जे “गोध्रा जळीत’ प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात होते, त्यांना सीबीआयमध्ये जागा देण्यात आली. आता मोदी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा कॉंग्रेसचा आरोप आहे. पोलीस खात्यात असताना अस्थाना यांनी लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांना चारा घोटाळ्यात गुन्हेगार ठरविले होते. पुढे अस्थाना यांना गुजरात केडरमध्ये घेतले, तेव्हा त्यांच्याकडे गोध्रा हत्याकांडाचा तपास सोपविण्यात आला. या हत्याकांडानंतर त्या राज्यात उसळलेल्या धार्मिक दंगलीत दोन हजारांवर मुस्लिमांची कत्तल झाली; मात्र त्या आरोपातील सगळ्या गुन्हेगारांना सोडून देण्याची “व्यवस्था’ अस्थानांनी केली. अस्थाना यांच्यावर गुन्हा नोंदविण्यामागे मोदींची काही नवी नाराजी आहे, की खात्यातील अधिकाऱ्यांची द्वेषभावना आहे, हे पाहायला हवे. अस्थाना लाच प्रकरणात आरोपी ठरत असतील तर या प्रकरणाची सूत्रे खोलवर दडली आहेत व त्याची चौकशीही तशीच होण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)