सीडीआर प्रकरणी आयेशा श्रॉफ यांची चौकशी

मुंबई : बेकायदेशीर कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढून त्याची विक्री केल्याच्या प्रकरणात गुरुवारी अभिनेता जॅकी श्रॉफ याची पत्नी  आयेशा श्रॉफ यांची ठाणे गुन्हे शाखेने चौकशी केली. चार तासांच्या चौकशीत आयेशाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. या चौकशीत सीडीआर प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती मिळाली असली तरी गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे. दरम्यान, याच प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी एका खासगी गुप्तहेराला अटक केली आहे.

ठाणे गुन्हे शाखा युनिट एकने बेकायदा सीडीआर खरेदी-विक्री प्रकरणाचा पर्दाफाश करत आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये खासगी गुप्तहेरांसह पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी याचेही नाव समोर आले. त्याला चौकशीसाठी बोलावूनही त्याने अद्याप हजेरी लावलेली नाही. अॅड. रिजवान सिद्दिकी याच्या अटकेनंतर याप्रकरणाने नवे वळण घेतले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नामुष्की ओढवल्याने ठाणे पोलिसांना रिजवान यांना मुक्त करावे लागले.
रिझवान यांच्या चौकशीत अभिनेता जॅकी श्रॉफ याची पत्नी आयेशा श्रॉफ यांचे नाव समोर आले. त्याच अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखेने आयेशा यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. गुरुवारी सकाळी ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात आयेशा यांनी हजेरी लावली. पोलिसांनी त्यांची चार तास चौकशी केली व जबाब नोंदवला. अॅड. रिझवान सिद्दिकी यांनी अभिनेता साहिल खान याचा सीडीआर काढण्यात तिची मदत केल्याचे आयेशा यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांकडून समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)