सीडबीकडून स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मोहीम 

नवी दिल्ली: महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधत सीडबी म्हणजे भारतीय लघु उद्योग विकास बॅंकेने राष्ट्रीय स्तरावर स्वयंउद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्यम अभिलाषा हे जागृती अभियान सुरू केले आहे. निती आयोगाने शोधलेल्या 115 विकास आकांक्षित जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवले जाणार असून त्या अंतर्गत 15000 युवकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.
3 ऑक्‍टोबर म्हणजे आजपासून 8 ऑक्‍टोबरपर्यंत देशभरात हे अभियान राबवले जाणार आहे. या अंतर्गत स्वत:चा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या मागास भागातील युवकांना 800 प्रशिक्षक उद्योगविषयक प्रशिक्षण देतील.
सीडबीने यासाठी सीएसई प्रशासन सेवा या विशेष सरकारी संस्थेशी भागीदारी केली आहे. या अंतर्गत युवकांना विविध तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. ज्यात युवतींवर विशेष भर दिला जाईल. त्याशिवाय हे अभियान राबवण्यासाठी सीडबीने बॅंका, नाबार्ड, वित्तीय संस्था आणि राज्य सरकारांचीही मदत घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)