सीएम साहेब.. पालिकेवर तुमचा भरवसा नाय काय !

तीन महिन्यांनंतर पालिकेच्या अवघ्या एका कार्यक्रमासाठी दिला वेळ
पुणे  : तब्बल तीन महिन्यांपासून स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरू असतानाच; शनिवारी पूर्ण दिवसभर पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेच्या केवळ एका शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाच्या उद्घाटनाला हजेरी लावत, स्मार्ट सिटी प्रकल्पाकडे अक्षरश: पाठ फिरविली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांसह महापालिकेच्या इतर प्रकल्पांच्या उद्घाटनासाठीही महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दोन वेळा मुंबई वारी केली. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी केवळ एकाच कार्यक्रमासाठी वेळ दिल्याने महापालिकेच्या कारभारावर दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीच नाराज असल्याचे भाजपच्या एका गोटातून बोलले जात आहे. त्यामुळे सीएम साहेब तुम्हाला पालिकेवर भरवसा नाय काय ? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वांकाक्षी असलेल्या स्मार्ट सिटी योजनेस 25 जून 2017 ला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्ती निमित्ताने स्मार्टसिटीची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका आयुक्तांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह चर्चा करून या प्रकल्पाती र्स्माट सिटी सेंटरचे उद्घाटन यासह मोफत वाय-फाय सुविधा या प्रकल्पांसह महापालिकेचा रामटेकडी येथील नवीन कचरा प्रकल्प आणि महापालिकेच्या इतर प्रकल्पांचे उद्घाटन प्रस्तावित केले होते.त्यासाठी जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच महापालिका प्रशासन तसेच भाजप पदाधिकाऱ्यांकडून या योजनांच्या उद्घाटनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागण्यात येत होती. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 25 जूनची वेळ पालिकेसाठी दिली होती. मात्र, यातील अनेक प्रकल्प चुकीच्या पध्दतीने केले जात असल्याची टिका विरोधकांकडून केली गेल्याने हा कार्यक्रम आयत्या वेळी पुढे ढकलण्यात आला. त्यानुसार, 7 जुलै ही तारीख महापालिकेस देण्यात आली. त्यानंतर ती रद्द करून पुन्हा 12 जुलैची तारीख देण्यात आली. मात्र, त्यानंतर थेट मुख्यमंत्री पुण्यात शनिवारी आले. ते सुध्दा महापालिकेच्या केवळ गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी त्यामुळे महापालिकेच्या इतर कार्यक्रमांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून वेळ मागणाऱ्या पालिका प्रशासन आणि भाजपाच्या कारभारावर मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
—————–
पुण्याच्या कारभारावर मुख्यमंत्री नाराज
गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय पातळीवर होणारे गैरव्यवहारांचे आरोप आणि त्यामुळे भाजपमध्ये उफऴून आलेली गटबाजी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे भाजपच्या आतल्या गोटातून सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीच कात्रज-कोंढवा रस्त्याची जादा दराने आलेली निविदा थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द केली होती. त्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा योजनेतील जलवाहीनीची निविदा वाढीव दराने आली.मात्र, ती मंजूर करण्यासाठी आयुक्त कुणाल कुमारांसह भाजपचे काही पदाधिकारी इच्छूक होते. मात्र, त्यावरून मोठया गैरव्यवहारांचे आरोप झाल्याने तसेच याची तक्रार थेट सीबीआय पर्यंत गेल्याने ही निविदा रद्द करण्यात आली.मात्र, त्यामुळे भाजमधील अंतर्गत वाद चव्हाटयावर आला. या वादावर कोणीही बोलू नये अशी तंबीच प्रदेशपातळीवरून देण्यात आली आहे. त्यामुळेच गेल्या तीन महिन्यात महापालिकेच्या केवऴ एका कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली असल्याने मुख्यमंत्री पुण्याच्या कारभारावर नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे.
—————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)