सीएम साहेब, पालिकेवर तुमचा भरवसा नाय काय !

तीन महिन्यांनंतर पालिकेच्या फक्‍त एका कार्यक्रमासाठी दिला वेळ
पिंपरीत मात्र पालिकेने केलेल्या कामांचे उद्‌घाटन

प्रभात वृत्तसेवा

पुणे – तब्बल तीन महिन्यांपासून स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ मिळविण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू होती. शनिवारी दिवसभर पुण्यात आलेल्या फडणवीस यांनी फक्‍त गणेशोत्सव उद्‌घाटनाला हजेरी लावली. पण, स्मार्ट सिटी प्रकल्पाकडे पाठ फिरविली. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध उद्‌घाटन कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. त्यामुळे सीएम साहेब, पालिकेवर तुमचा भरवसा नाय काय?, असा प्रश्‍न विरोधकांनी निर्माण केला आहे.

स्मार्ट सिटी योजनेची 25 जूनला वर्षपूर्ती झाली. यानिमित्ताने स्मार्ट सिटीची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका आयुक्तांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह चर्चा करून स्मार्ट सिटी सेंटरचे उद्‌घाटन, मोफत वाय-फाय सुविधा, रामटेकडी येथील नवीन कचरा प्रकल्प आणि महापालिकेच्या इतर प्रकल्पांचे उद्‌घाटन प्रस्तावित केले होते. त्यासाठी जूनच्या सुरूवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ मागण्यात येत होता. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 25 जूनची वेळ पालिकेसाठी दिली होती. मात्र, यातील अनेक प्रकल्प चुकीच्या पध्दतीने होत असल्याची टीका विरोधकांनी केल्याने हा कार्यक्रम आयत्या वेळी पुढे ढकलण्यात आला. त्यानुसार, 7 जुलैची तारीख देण्यात आली. त्यानंतर ती रद्द करून पुन्हा 12 जुलैची तारीख देण्यात आली. मात्र, त्यानंतर थेट मुख्यमंत्री पुण्यात शनिवारी आले. ते सुध्दा महापालिकेच्या केवळ गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी. त्यामुळे महापालिकेच्या इतर कार्यक्रमांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून वेळ मागणाऱ्या पालिका प्रशासन आणि भाजपच्या कारभारावर मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे.

पुण्याच्या कारभारावर मुख्यमंत्री नाराज
गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय पातळीवर होणारे गैरव्यवहारांचे आरोप आणि त्यामुळे भाजपमध्ये उफऴून आलेली गटबाजी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे भाजपच्या आतल्या गोटातून सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीच कात्रज-कोंढवा रस्त्याची जादा दराने आलेली निविदा थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द केली होती. त्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीची निविदा वाढीव दराने आली. मात्र, ती मंजूर करण्यासाठी आयुक्त कुणाल कुमारांसह भाजपचे काही पदाधिकारी इच्छूक होते. मात्र, त्यावरून मोठ्या गैरव्यवहारांचे आरोप झाल्याने तसेच याची तक्रार थेट सीबीआयपर्यंत गेल्याने ही निविदा रद्द करण्यात आली. मात्र, त्यामुळे भाजमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. या वादावर कोणीही बोलू नये, अशी तंबीच प्रदेशपातळीवरून देण्यात आली आहे. त्यामुळेच गेल्या तीन महिन्यांत महापालिकेच्या फक्‍त एका कार्यक्रमास हजेरी लावल्याने पुण्याच्या कारभारावर मुख्यमंत्री नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)