सीएम चषकाचा साताऱ्यात राजकीय षटकार

भाजपचे कार्यकर्ते लागले कामाला

सातारा – तब्बल साडेपाच लाख स्पर्धकांची नोंद झालेल्या सीएम चषक स्पधेच्या निमित्ताने भाजपाने सातारा जावली मतदारसंघातील राजकीय वातावरण तापवायला सुरवात केली आहे. राष्ट्रवादीच्या होमपीचवर भाजप कोणता षटकार मारणार ही खरी उत्सुकता आहे. मात्र या चषकाच्या निमित्ताने भाजपचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र मतदारसंघात पहायला मिळत आहे. तब्बल आठ क्रीडा प्रकार व इतर गुणदर्शनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात मोठी राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

सातारा-राज्यासह देशात निवडणुकांचा हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. राजकारणाचा ‘खेळ’ रंगण्याआधीच भाजपने खेळाच्या मैदानावर राजकीय चषकाचा नवा ‘डाव’ मांडला आहे. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांत 30 ऑक्‍टोबर 2018 ते 12 जानेवारी 2019 दरम्यान ‘सीएम चषक’ क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. शहरी भागात वॉर्डनिहाय स्पर्धाही घेण्याचे नियोजन आहे. त्याची धुरा नगरसेवकांवर असेल.

या महोत्सवाच्या माध्यमातून तरुणाई व नवमतदार आपल्याकडे वळवून घेण्याची ही खेळी असल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबतची कोणतीही ठोस रूपरेषाच मिळालेली नसल्याने क्रीडा संचालकांपासून जिल्ह्यातील क्रीडा अधिकारीही पेचात सापडले. क्रीडामंत्र्यांनी युवा गट नाकारला क्रीडा महोत्सवामध्ये अधिक युवा खेळाडू सहभागी व्हावेत यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. यासाठी बैठकीत क्रीडा अधिकाऱ्यांनी युवांच्या 12, 14 आणि 16 वर्षांखालील वयोगटात स्पर्धा घेण्याचे सुचवले होते. मात्र, खुद्द क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी हा युवा गट नाकारला. तसेच या स्पर्धेत 18 वर्षांखालील खेळाडू मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, अशी स्पष्ट ताकीदच दिली आहे. नवा मतदार जोडण्यासाठीच हा अट्टहास केला जात असल्याची अधिकाऱ्यांची ओरड आहे.

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सीएम चषकाची धामधून सुरू झाली असून मतदार संघ निहाय जबाबदारीचे विभाजन करण्यात आले आहे. सातारा विधानसभा मतदार संघात 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर या दरम्यान सातारा शहरात छ. शाहू स्टेडिअम, न्यु इंग्लिश स्कूल, तालीम संघ मैदान, अनंत इंग्लिश स्कूल, मौजे कुडाळ व सैदापूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गायन, व्हालीबॉल, 100 मी. धावणे, 400 मी. धावणे, कॅरम, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्रिकेट, खो-खो, कब्बडी, व कुस्ती या विविध क्रीडा प्रकारातून सातारा विधानसभा मतदार संघातील साडे तीन लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचा हा एक प्रयत्न आहे. या कामाकरीता 11 भाजप सदस्यांची कार्यकारीणी निश्‍चित करण्यात आली असून प्रत्येकाकडे जबाबदारीचे विभाजन करून देण्यात आले आहे. या सीएम चषकाचा भाजपचे प्रस्तावित उमेदवार दीपक पवार यांना कितपत फायदा होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे तगडे आव्हान या मतदार संघात आहे. येथे चमत्कार घडवण्यासाठी सीएम चषकाचा षटकार कसा मारला जाणार यावरच पुढील निकालचे भवितव्य अवलंबून आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)