सीएनजी बस खरेदीसाठी 116 कोटी

टप्प्याटप्प्याने निधी देण्यास स्थायी समितीची मान्यता

पुणे – पुणे महानगर प्रादेशिक परिवहन महामंडळ प्रा.लि (पीएमपीएमएल)साठी सुमारे 400 सीएनजी बसेस घेण्यासाठी पुणे महापालिकेकडून 116 कोटी 17 लाख रुपयांचे अनुदान पीएमपीला दिले जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी 400 सीएनजी, बीआरटी, नॉन एसी बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव यावर्षी 23 मे रोजी मंजुर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यास अधिकाधिक बस उत्पादकांकडून प्रतिसाद मिळावा यासाठी वर्तमानपत्रात तीनवेळा जाहीर निविदा मुदतवाढ प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदेमध्ये सहभागी टाटा मोटर्स कंपनीने बीआरटीसाठी उपयुक्त असणाऱ्या 900 एमएम फ्लोअर हाईट, 11-12 मीटर लांबी, यूरो-4, सीएनजी विथ आयटीएमएस, सात वर्षे आयटीएमएस आणि वॉरंटीसह प्रति बससाठी सुमारे 48 लाख 79 हजार रुपये इतके दर सादर केले होते. टाटा मोटर्सबरोबर झालेल्या चर्चेनंतर सुमारे 48 लाख 40 हजार रुपये इतक्‍या दराने बस घेण्याचे मान्य करण्यात आले.

महापालिका देणार 60 टक्‍के रक्‍कम
पीएमपीमध्ये पुणे महापालिकेचा 60 टक्‍के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 40 टक्‍के हिस्सा आहे. त्यानुसार, या बस खरेदीसाठी संचालक मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महापालिकेच्या हिश्‍याच्या साठ टक्‍के म्हणजेच 400 पैकी 240 बसेस खरेदीसादी प्रति बस 48 लाख 40 हजार रुपये याप्रमाणे सुमारे 116 कोटी 17 लाख रुपये पीएमपीएमएलला टप्प्याटप्प्याने वर्ग करण्यात येणार आहे. या बस खरेदी पालिकेच्या 2018-19 च्या अंदाजपत्रकात 73 कोटी रुपयांची तरतूद केलेली बस खरेदीसाठी काही कालावधी जाणार असल्याने पुढील आर्थिक वर्षात उर्वरीत निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

ब्रेक डाऊनवर उपाययोजना करा
हा निधी मंजूर करताना याबाबतची माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून स्थायी समितीमध्ये देण्यात आली. यावेळी सदस्यांनी पीएमपीच्या वाढत्या ब्रेकडाऊन वरून नाराजी व्यक्त केली. तसेच या ब्रेकडाऊनमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर असून त्याबाबत पीएमपीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सध्याच्या ताफ्यात असलेल्या बसचे आर्युमान संपत आल्याने तसेच देखभाल दुरुस्तीही खर्चीक होत असल्याने नवीन बस आल्यानंतर हे प्रमाण कमी होईल असे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)