पुणे – सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थांनी प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करणाऱ्या संस्थांचे येत्या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सीईटी सेलमार्फत करण्यात येतील, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे.
येत्या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शासकीय, अनुदानित, महापालिका, अल्पसंख्यांक, खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्रवेश राज्य सीईटी सेलमार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व मान्यताप्राप्त संस्थांनी प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर त्यांनी वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार नोंदणी करणे अनिवार्य आहे. ज्या मान्यताप्राप्त संस्था आवश्यक कागदपत्रासह संकेतस्थळावर नोंदणी करणार नाहीत, अशा संस्थांचे प्रवेश राज्य सीईटीमार्फत केले जाणार नाही. त्याची सर्व जबाबदारी संबंधित संस्थांची राहिल. ही बाब विभागीय तंत्रशिक्षण संचालनालय कार्यालयाने संस्थांच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही वाघ यांनी म्हटले आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य सीईटी सेलकडून सर्व संबंधित संस्थांना कळविण्यात आले आहे.