सीईओ मुंबईला जाताच झेडपीत शुकशुकाट

अधिकारी तालुक्यांकडे तर कार्यालयीन कर्मचार्‍यांची टंगळमंगळ

सातारा,दि.26 (प्रतिनिधी) -मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे हे कामानिमित्त मुंबईला जाताच जिल्हा परिषदेत शुकशुकाट निर्माण झाल्याचे शुक्रवारी दिसून आले. विविध विभागांचे प्रमुख अधिकारी हे शासकीय भेटीच्या निमित्ताने वेगवेगळ्या तालुक्याच्या दौर्‍यावर गेले होते तर बहुतांश कर्मचारी कार्यालयात टंगममंगळ करताना दिसून आले. त्याचबरोबर काही कर्मचार्‍यांनी चार वाजताच घरचा रस्ता पकडल्याने झेडपीचे बायोमेट्रीक केवळ नावापुरतेच उरले असल्याचे सिध्द झाले.
कैलास शिंदे हे शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमासाठी गेले होते. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विविध समित्यांचे सभापती देखील कार्यालयात उपस्थित नव्हते. अति. मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे कोरेगावला , सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित बडे हे महाबळेश्वरला, ग्रामविकास विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे हे वाईला, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार हे म्हसवडला तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार हे देखील प्रशासकीय कामासाठी भागाकडे तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी अर्जुन बन्ने हे रजेवर गेले असल्याचे कार्यालयातील कर्मचार्‍यांनी सांगितले.
साहजिकच पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे बहुतांश कर्मचारी हे ऑन ड्युटी कार्यालयाबाहेर गेले होते. त्यामुळे बहुतांश विभागातील कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या ; तर काही मोजके अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यापैकी बोटावर मोजण्या इतपत अधिकारी व कर्मचारी कामात प्रामाणिकपणे व्यस्त होते. मात्र, बहुतांश कर्मचार्‍यांचा गप्पांचा फड रंगला होता तर काही जण मोबाईलवर टाईमपास करताना दिसून येत होते. तर काही कर्मचार्‍यांनी चक्क बायोमेट्रीक मशिनकडे दुर्लक्ष करित चार वाजताच घरचा रस्ता धरल्याचे दिसून आले. त्यामुळे झेडपीत मुख्यअधिकारी जाताच प्रशासकीय कारभार कसा चालतो, याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारवाई काय करणार ?
मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांची अत्तापर्यंत शिस्तबध्द अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांच्या शिस्तबध्द कार्यक्रमामुळेच जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत अभियानात देशात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांनी कामचुकार अधिकारी व कर्मचार्‍यांवर देखील कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत जिल्हा परिषदेत नेमके कामकाज कसे चालते, हे वृत्ताच्या माध्यमातून समोर आले आहे. तेव्हा ऑन ड्युटी गायब राहणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांबाबत ते काय कारवाई करणार, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

सीसीटीव्ही हवेत सर्वत्र
जिल्हा परिषदेच्या आवारात तसेच सर्व मजल्यांच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या कॅमेर्‍यांची नजर ही केवळ येणार्‍या व जाणार्‍यांकडेच असते. मात्र, खर्‍या अर्थाने येत्या काळात सातवा वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी किती वेळ गांभिर्याने काम करतात, हे आता वरिष्ठ अधिकार्‍यांना ही कळावे यासाठी आता सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज निर्माण झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)