सिव्हीलमध्ये सिटी स्कॅन मशीन फेब्रुवारी महिन्यात बसणार

आरोग्यमंत्री दीपक सावंत : वैद्यकीय रिक्तपदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू

सातारा – राज्यातील प्रत्येक जिल्हा शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन बसविण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बजेटमध्ये आर्थिक तरतूद केली असून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात येत्या फेब्रुवारी महिन्यात हे मशीन बसेल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.

-Ads-

सातारा जिल्हयात स्वाईन फ्ल्यूने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री दीपक सावंत हे रविवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी वैद्यकीय कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ग्वाही दिली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. सावंत म्हणाले, सिटी स्कॅन मशीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून ही मशीन जपान देशातून येणार असल्याने किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार आहे. प्रत्येक रुग्णालयात मशीन बसविण्यासाठी पायाभूत सुविधा तयार आहेत त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात मशीन बसेल तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आड येणार नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात एमडी मेडिसीन दर्जाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे पत्रकारांनी ना. सावंत यांना निदर्शनास आणून दिले. त्यावर स्पष्टीकरण देताना ना. सावंत म्हणाले, वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याचे पूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यांच्याकडून पदे भरण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू असून डॉक्‍टरांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करून ना. सावंत म्हणाले, वर्ग-एक दर्जाची वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याचे अधिकार आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारकडे घेण्यात आले आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनाचा व ग्रामीण भागात काम करण्याचा प्रश्न शिल्लक असून तो लवकरात लवकर सोडवून पदे भरण्यात येतील, असे ना. सावंत यांनी सांगितले.

नाथा खाडे प्रकरणाची चौकशी करणार
औंध, ता. खटाव येथे पोलिसांनी गर्भलिंग निदान करणाऱ्या नाथा खाडे याला रंगेहाथ पकडले होते. कारवाईत अटक करून सोनोग्राफी मशीनसह वाहने ही जप्त केली होती. मात्र, त्यानंतर नाथा खाडेला न्यायालयात हजर न करता परस्पर सोडून देण्यात आले, ही बाब पत्रकारांनी ना.सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ना. सावंत यांनी या प्रकरणाची आठ दिवसात आपण गंभियाने चौकशी करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)