सिरीयातील तणावामुळे क्रुड आणखी महागण्याची शक्‍यता

 भांडवल बाजारावर परिणाम शक्‍य : संघर्ष चिघळल्यास निर्देशांकांवर होईल परिणाम

नवी दिल्ली – सिरीयावर हल्ले करण्याची अमेरिकेने धमकी दिल्यामुळे क्रुडचे दर वाढले होते. आता अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रानी सिरीयावर प्रत्यक्ष हल्ला केल्यामुळे क्रुडचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर हा प्रश्‍न चिघळला तर भांडवलबाजारावरही परिणाम होऊ शकतो. जर अमेरिका आणि तिचे मित्र देश सिरीयावर हल्ले करतील तर रशिया गप्प बसणार नाही, असे रशियाने सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळले तर मध्य पूर्वेत तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तो जितका जास्त काळ चालेल तेवढा तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होऊन तेलाचे दर वाढण्याची शक्‍यता आहे.

सध्या क्रुडचे दर 71.66 प्रति पिंपावर गेले आहेत. त्यामुळे भारतात गेल्या काही महिन्यापासून इंधनाचे दर वाढत आहेत. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंक आणि सरकारही सावध आहे. पतधोरण बैठकीत या विषयवर चर्चा होत असते. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेनेही गेल्या आठ महिन्यापासून महागाई तुलनेने कमी पातळीवर असूनही व्याजदरात कपात केलेली नाही. आता जर क्रुड आणखी वाढले तर त्यामुळे महागाई वाढून गरज पडल्यास व्याजदर वाढीच्या शक्‍यतेवर विचार होऊ शकतो. भारतात आगामी काळात निवडणूका असल्यामुळे सरकार इंधनाचे दर वाढविण्याची शक्‍यता कमी आहे मात्र त्यामुळे चालू  खात्यावरील तूट वाढते.

जर हा पेच लांबला तर त्याचा फक्त क्रुडवरच नाही तर शेअरबाजारावरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्‍यता आहे. हल्ले शनिवारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. त्यामुळे सोमवारी जागतिक शेअरबाजाराचे काम सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात. यावर निर्देशांकांची वाटचाल अवलंबून राहणार आहे. रशियाने आणि इराणने या हल्ल्यानंतर फार तिखट प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हा पेच फारसा चिघळणार नाही असे   समजण्यालाही वाव आहे.

सिरीयाचा पेच जुना आहे. तो देश छोटा आहे. सिरीयातून क्रुडची फार कमी प्रमाणात निर्यात होते. मात्र त्यामुळे या अगोदर असे प्रकार घडले तेव्हा जागतिक गुंतवणूकदारांनी दीर्घ पल्ल्यात त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. मात्र लघु पल्ल्यात त्याचा शेअरबाजारावर परिणाम होऊ शकतो असे काही विश्‍लेषकांना वाटते. जर तसे झालेच तर दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यासाठी खरेदीची संधी निर्माण होणार आहे.

अमेरिका आणि चीनदरम्यानचे व्यापारातील मतभेद आणि सिरीयातील घडामोडीनंतरही भारतीय शेअरबाजारात सरलेल्या आठवड्यात चांगली खरेदी झाली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 565 अंकानी वाढला. तर गेल्या दोन आठवड्यात 1030 अंकानी वाढला आहे. भारतातील स्थूल अर्थव्यवस्था बळकट होण्याची लक्षणे दिसत आहेत. महागाई कमी झाली आहे. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादनात वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक होते. आता कंपन्याच्या ताळेबंदावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)