सिम्बायोसिस आयोजित राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा : पृथा वर्टीकर आणि जश मोदी यांना विजेतेपद 

पुणे – पुणे शहरच्या अग्रमानांकित पृथा वर्टीकर आणि मुंबई शहरचा दुसरे मानांकन असलेला जश मोदी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर परस्परविरुद्ध शैलीत विजय मिळविताना येथे पार पडलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे सबज्युनियर मुली व मुलांच्या एकेरीत विजेतेपद पटकावले आहे. सिम्बायोसिस आयोजीत ही स्पर्धा सिम्बायोसिस स्पोर्टस सेंटर, प्रभात रोड येथे पार पडली. सबज्युनियर मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात पुणे शहरची अग्रमानांकित खेळाडू पृथा वर्टीकरने ठाणे शहरच्या दुसरे मानांकन असलेल्या खेया शहाचा 11-7, 12-10, 11-5, 11-9 असा पराभव करताना विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी, पृथाने उपान्त्यपूर्व फेरीत ठाणे शहरच्या आठवे मानांकन असलेल्या आर्या सोंगडकरचा 14-12, 8-11, 11-6, 11-8 असा संघर्षपूर्ण पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता. तर उपान्त्य फेरीत तिने ठाणे शहरच्याच चौथे मानांकन असणाऱ्या तिया वाघचा 13-11, 11-9, 13-11, 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.

त्याआधी ठाण्याच्या द्वितीय मानांकित खेया शहाने उपान्त्यपूर्व फेरीत पुणे शहरच्या सातवे मानांकन असलेल्या अनीहा डिसोझाचा 7-11, 6-11, 11-9, 11-2, 11-7 असा संघर्षपूर्ण पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता. तर उपान्त्य फेरीत मुंबई शहरच्या तृतीय मानांकित संपदा भिवंडकरचा 8-11, 11-7, 12-10, 11-6, 7-11, 11-8 असा संघर्षपूर्ण पराभव करताना तिने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सबज्युनियर मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात मुंबई शहरच्या द्वितीय मानांकित जश मोदीने मुंबई शहरच्याच आठवे मानांकन असलेल्या समीहन कुलकर्णीचा 11-6, 11-7, 5-11, 11-7, 11-8 असा संघर्षपूर्ण पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले.

तत्पूर्वी, उपान्त्यपूर्व फेरीत जश मोदीने पुणे शहरच्या बिगरमानांकित अर्चन आपटेचा 11-8, 11-4, 11-2 असा सहज पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता, तर उपान्त्य फेरीत त्याने मुंबई शहरच्या तृतीय मानांकित हविश असराणीचा 11-8, 6-11, 11-9, 11-9, 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.
दरम्यान मुंबई शहरच्या आठव्या मानांकित समीहन कुलकर्णीने उपान्त्यपूर्व फेरीत मुंबई शहरच्याच अग्रमानांकित राजीव शहाचा 11-1, 6-11, 11-8, 11-9 असा सहज पराभव करत स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता. तर उपान्त्य फेरीत त्याने मुंबई शहरच्या चौथे मानांकन असलेल्या अर्णव कर्नावकरचा 4-11, 11-7, 11-7, 9-11, 7-11, 11-3, 11-6 असा संघर्षपूर्ण पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)