सिमेंट रस्त्यांची कामे तातडीने बंद करा

पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर सजग नागरिक मंचाची मागणी

पुणे – महापालिकेने सुरू केलेली तसेच मान्यतेच्या प्रक्रियेत असलेली गल्ली-बोळांमधील रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या महिनाभरापासून महापालिका आणि जलसंपदा विभागात शहराच्या पाण्यावरून वाद सुरू आहेत. कालवा समितीच्या बैठकीत मंजूर झालेला पाणी कोटाच पालिकेने शहरासाठी वापरावा, अशी भूमिका घेत जलसंपदा विभागाने पाणी कमी केले आहे. परिणामी, पुण्यात एक वेळ पाणी देण्याची वेळ मनपावर आली आहे. त्यातही अनेक भागांत दीड ते दोन तासच पाणी मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर मनपाने पाण्याची काटकसर करण्याचे उपाय तातडीने हाती घेण्याची मागणी मंचाने केली आहे. गेल्या काही वर्षांत मागणी नसताना गल्ली-बोळांत रस्ता कॉंक्रिटीकरणाचे पेव फुटले आहे. यंदाही अशी असंख्य कामे प्रस्तावित आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे टॅंकर विकत घेण्याची वेळ येत असताना, दुसरीकडे कॉंक्रिटीकरणासाठी पाणी वापरणे हा अपव्यय आहे. दोन वर्षांपूर्वी पाणी कपातीचे संकट आले असताना तत्कालीन आयुक्तांनी अशा कामांना स्थगिती दिली होती. या वर्षीही अशा सर्व कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी मंचाने महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

शुद्ध पाण्याचा बेकायदेशीर वापर
सिमेंट रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात शुद्ध पाणी वापरले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. हे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या आसपास असलेल्या जलवाहिनीला “टॅप मारून’ नळजोड घेऊन पाणी वापरले जात आहे. तर काही ठिकाणी चक्क टॅंकर मागवून शुद्ध पाणी वापरले जात आहे. ही बाब पथ आणि पाणीपुरवठा विभागासही माहीत आहे. मात्र, संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालणे तसेच विकासकामांच्या नावाखाली हा प्रकार सुरू असून लाखो लिटर पाण्याचा अपव्यवय होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)