#सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धा: सेरेना विल्यम्सची विजयी सलामी 

दहाव्या मानांकित ज्युलियाला लाडेनोविचचा धक्‍का 
सिनसिनाटी: गेल्या दोन दशकांपासून महिला टेनिसवर राज्य करणाऱ्या सेरेना विल्यम्सने दारिया गावरिलोव्हाचा सरळ सेटमध्ये दुव्वा उडविताना सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत विजयी सलामी दिली. आगामी अमेरिकन ओपन स्पर्धेच्या तयारीसाठी या स्पर्धेला महत्त्व दिले जाते. केवळ दोन आठवड्यांपूर्वी सॅन जोस स्पर्धेत योहाना कॉन्टाविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील सर्वात वाईट पराभवाला सामोरे जावे लागलेल्या सेरेनाने त्यातून पूर्णपणे सावरल्याचे दाखवून देताना गावरिलोव्हाचा 6-1, 6-2 असा फडशा पाडला. मातृत्वाच्या रजेनंतर सेरेनाला अद्याप पूर्वीचा सूर गवसलेला नाही. परंतु सिनसिनाटी स्पर्धेतील सलग 11 व्या विजयाची नोंद करताना सेरेनाने पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. सेरेनाने 2013 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर 2014 आणि 2015 अशी सलग दोन वर्षे सिनसिनाटी स्पर्धा जिंकली होती.
दरम्यान बिगरमानांकित क्रिस्टिना लाडेनोविच 6-4, 3-2 अशी आघाडीवर असताना दहाव्या मानांकित ज्युलिया जॉर्जेसने माघार घेतल्यामुळे स्पर्धेत पहिल्या मानांकिताचे आव्हान संपुष्टात आले. मात्र दोन आठवड्यांपूर्वी सेरेनाला चकित करणाऱ्या योहाना कॉन्टाला आर्यना सबालेन्काविरुद्ध 6-4, 3-6, 4-6 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच पहिल्या फेरीच्या आणखी एका लढतीत रेबेक्‍का पीटरसनने कॅटरिना सिनियाकोव्हाचा प्रतिकार 2-6, 6-4, 6-1 असा मोडून काढताना दुसऱ्या फेरीत धडक मारली.
बिगरमानांकित ऍलिझ कॉर्नेटने 11व्या मानांकित येलेना ऑस्टापेन्कोवर 1-6, 7-5, 6-0 अशी संघर्षपूर्ण लढतीत मात करताना स्पर्धेतील दुसऱ्या खळबळजनक निकालाची नोंद केली. तसेच दोन बिगरमानांकित खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत ऍला टॉमजेनोविचने इरिना कॅमेलिया बेगूचे कडवे आव्हान 4-6, 6-3, 6-3 असे संपुष्टात आणताना दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
महिला दुहेरीत ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हा व ऍनेस्तेशिया पावलुचेन्कोव्हा या जोडीने आर्यना सबालेन्का व सु वेई हसिह या जोडीचे आव्हान 2-6, 6-3, 13-11 असे मोडून काढताना विजयी सलामी दिली. तर व्हेरा झ्वोनारेव्हा व रालुका ओलारू या जोडीने व्हॅनिया किंग व कॅटरिना स्रेबोटनिक या जोडीचा कडवा प्रतिकार तीन सेटच्या झुंजीनंतर 6-3, 4-6, 10-3 असा संपुष्टात आणताना दुसरी फेरी गाठली.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)