क्‍विटोव्हासमोर किकी बर्टन्सचे कडवे आव्हान 

सिनसिनाटी: अग्रमानांकित सिमोना हालेप व आठवी मानांकित पेट्रा क्‍विटोव्हा या मानांकितांसह किकी बर्टन्स आणि आर्यना सबालेन्का या बिगरमानांकित खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. मात्र पाचवी मानांकित एलिना स्विटोलिना आणि 13वी मानांकित मॅडिसन कीज या मानांकितांचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

अग्रमानांकित सिमोना हालेपने दुसऱ्या फेरीत ऍला टॉमजेनिविचविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर 4-6, 6-4, 6-3 असा झुंजार विजय मिळविला होता. त्यानंतर एकाच सत्रात दोन सामने खेळणाऱ्या हालेपने दोन्ही लढतींमध्ये पिछाडीवरून विजयाची नोंद करताना उपान्त्य फेरी गाठली. तिसऱ्या फेरीत हालेपने 16व्या मानांकित ऍश्‍ले बार्टीचे आव्हान दोन्ही सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करताना 7-5, 6-4 असे मोडून काढले.

उपान्त्यपूर्व फेरीत हालेपने लेसिना त्सुरेन्कोचा कडवा प्रतिकार पहिल्या सेटमध्ये 1-4 अशी पिछाडीवर पडल्यानंतर आपला खेळ उंचावताना 6-4, 6-1 असा संपुष्टात आणताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. हालेपसमोर उपान्त्य फेरीत आर्यना सबालेन्काचे कडवे आव्हान आहे. सबालेन्काने सलग दुसऱ्या फेरीत मानांकित खेळाडूवर सनसनाटी मात करताना 13व्या मानांकित मॅडिसन कीजचे आव्हान 6-4, 6-3 असे मोडून काढत अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.

पुनरागमनासाठी प्रयत्नलशील असलेली टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आणणाऱ्या आठव्या मानांकित पेट्रा क्‍विटोव्हाने उपउपान्त्यपूर्व फेरीत क्रिस्टिना लाडेनोविचचा 6-4, 6-2 असा धुव्वा उडवीत आगेकूच केली. तसेच पेट्रा क्‍विटोव्हाने उपान्त्यपूर्व फेरीत बेल्जियमच्या एलिसे मेर्टेन्सचा कडवा प्रतिकार 7-5, 5-7, 6-3 असा मोडून काढताना उपान्त्य फेरीत धडक मारली.

दोनदा विम्बल्डन स्पर्धा जिंकणाऱ्या पेट्रा क्‍विटोव्हासमोर उपान्त्य फेरीत किकी बर्टन्सचे आव्हान आहे. अखेरच्या उपान्त्यपूर्व सामन्यात किकी बर्टन्सने पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाचा 6-4, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करताना सनसनाटी विजयासह उपान्त्य फेरी गाठली. पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाने त्याआधी माजी अमेरिकन ओपन विजेत्या स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हाची झुंज संपुष्टात आणली होती. मात्र किकी बर्टन्ससमोर तिचा निभाव लागला नाही. किकी बर्टन्सने त्याआधी ऍना कॉन्टाव्हेटची झुंज तीन सेटच्या लढतीनंतर 6-3, 2-6, 6-3 अशी मोडून काढताना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)