सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धा: तृतीय मानांकित झ्वेरेव्हचे आव्हान संपुष्टात 

फेडरर, जोकोविच, वॉवरिन्का, सिलिच, अँडरसन यांची आगेकूच 
सिनसिनाटी: हॉलंडचा अनुभवी खेळाडू रॉबिन हॅसेविरुद्ध तीन सेटच्या कडव्या झुंजीनंतर पराभव पत्करावा लागल्यामुळे तृतीय मानांकित अलेक्‍झांडर झ्वेरेव्हचे सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. रॉबिन हॅसेने झ्वेरेव्हवर 5-7, 6-4, 7-5 अशी मात करताना उपउपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.
दरम्यान द्वितीय मानांकित रॉजर फेडरर, विम्बल्डन विजेता नोव्हाक जोकोविच, दुखापतीतून परतण्यासाठी प्रयत्नशील असलेला स्टॅनिस्लास वॉवरिन्का, सातवा मानांकित मेरिन सिलिच, विम्बल्डन उपविजेता केविन अँडरसन यांच्यासह पाचवा मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह, 11वा मानांकित डेव्हिड गॉफिन व 13वा मानांकित पाब्लो कॅरेरो बस्टा या मानांकितांसह मार्टन फस्कोव्हिक्‍स, केरेन खाचानोव्ह व डेनिस शापोव्हालोव्ह या बिगरमानांकितांनीही वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना उपउपान्त्यपूर्व फेरी गाठली.
फेडररने पीटर गोजोविकचा 6-4, 6-4 असा पराभव करताना सूर गवसल्याचे दाखवून दिले. मात्र दहाव्या मानांकित नोव्हाक जोकोविचला ऍड्रियन मॅनेरिनोविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागली. अखेर जोकोविचने ही लढत 4-6, 6-2, 6-1 अशी जिंकून आगेकूच केली. जोकोविचला गेल्याच आठवड्यात टोरांटो स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत खळबळजनक पराभव पत्करावा लागला होता.
दुखापतीतून परतणाऱ्या स्टॅनिस्लास वॉवरिन्काने जपानच्या केई निशिकोरीचा 6-4, 6-4 असा पराभव करीत आपली घोडदौड कायम राखली. तसेच कॅनडाचा गुणवान खेळाडू डेनिस शापोव्हालोव्हने 14व्या मानांकित कायली एडमंडवर 6-4, 7-5 अशी मात करताना पुन्हा एकदा सरस मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजयाची नोंद केली. तसेच सातव्या मानांकित मेरिन सिलिचने मेरियस कॉपिलविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर झुंजार पुनरागमन करताना 6-7, 6-4, 6-4 अशा विजयासह उपउपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.
दरम्यान विम्बल्डन उपविजेत्या केविन अँडरसनने बिगरमानांकित जेरेमी चार्डीला 7-6, 6-2 असे पहिल्या सेटमधील झुंजीनंतर पराभूत केले. तर पाचव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हने बिगरमानांकित मिशा झ्वेरेव्हचा प्रतिकार 7-6, 7-5 असा मोडून काढत आगेकूच केली. आणखी एका लढतीत 11व्या मानांकित डेव्हिड गॉफिनला बेनॉइट पायरेला पराभूत करण्यासाठी 5-7, 6-4, 6-2 अशी लढत द्यावी लागली. तसेच तेराव्या मानांकित पाब्लो कॅरेरो बस्टाने ब्रॅडली क्‍लानवर 6-4, 6-4 असा सहज विजय मिळवीत अखेरच्या 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)