सिद्धू पुराण ! (अग्रलेख)

भाजपचे पाकिस्तानबाबत नेमके काय धोरण आहे हेच आजवर कोणाला उमगले नाही. एकदा धडा शिकवण्याची भाषा, नंतर मैत्रीसाठी स्वत:हून हात पुढे करून आपलीच पाठ थोपटून घेण्याची भूमिका आणि पुन्हा पाकिस्तानकडून फसगत झाल्याची सततची ओरड या साऱ्या मालिकांमधून भाजपच अनेक वेळा सैरभैर किंवा दिशाहीन झालेली दिसली आहे. पाकिस्तानविषयीच्या धोरण सातत्याच्या अभावाची भाजपची कमतरता सिद्धू प्रकरणावरूनही पुन्हा अधोरेखीत झाली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपधविधीसाठी त्यांच्याच निमंत्रणावरून पाकिस्तानला गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील कॉंग्रेस सरकारचे एक मंत्री नवज्योत सिद्धू काल वाघा सीमेवरून भारतात परत आले. त्यांच्या पाकिस्तान भेटीने, इकडे भाजपच्या प्रवक्‍त्यांवर जणू आकाश कोसळले. पाकिस्तानी लष्कर प्रमुखांशी त्यांची तेथे झालेली गळाभेट ही भाजपने महापातक मानले. त्यांच्या बसण्याच्या जागेवरूनही मोठाच कोलहाल झाला. या साऱ्या बाबींवर खुद्द सिद्धू यांनीच भारतात परत आल्यावर नेमकेपणाने उत्तरे दिली आहेत. सिद्धू पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरच्या अध्यक्षांच्या शेजारील खुर्चीवर बसले होते, हा त्यांच्यावरील एक मोठा आक्षेप होता.

एखाद्या महत्वाच्या सरकारी कार्यक्रमात कोणी कोठे बसायचे याचा क्रम आधीच ठरलेला असतो आणि त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या त्या खुर्च्यांवर चिटकवलेल्या असतात. त्यामुळे खुर्च्यांचा क्रम कसा लावायचा आणि कोणाशेजारी कोणी बसायचे, हा निर्णय सिद्धू यांच्या हातात नव्हता. पण त्यातही त्यांना दोषी ठरवले गेले. आपल्या रांगेत नवज्योत सिद्धू बसल्याचे लक्षात येताच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हे स्वत: त्यांच्या दिशेने चालत गेले. त्यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली आणि गळाभेटीने या भेटीचा समारोप झाला. भाजपच्या मते सिद्धू यांची ही कृती राष्ट्रद्रोही होती. भाजपचा हा आरोप योग्य की अयोग्य हे ज्यांनी-त्यांनी आपआपल्या वैचारिक बैठकीनुसार ठरावयाचे आहे. येथे सिद्धू यांचे समर्थन करण्याचा किंवा त्यांच्या कृतीला प्रोत्साहन देण्याचा विषय नाही; पण पंतप्रधान झालेल्या एका मित्राने दुसऱ्या देशातील आपल्या जुन्या मित्राला स्वत:च्या शपथविधीसाठी आवर्जून निमंत्रण दिल्यानंतर त्याचा स्विकार करण्याच्या कॉंग्रेसमधील एका तिसऱ्या फळीतील व्यक्तीला त्याच्या कृतीतील क्षुल्लक उणिवा काढून झोडपणे, हे कोणत्या मानसिकतेत मोडते याचा उलगडा होत नाही.

भाजप आणि कॉंग्रेस यांच्यातील वैचारिक मतभेद कायमच राहणार; पण म्हणून त्यासाठी कोणत्याही घटनांचा आधार घेऊन असली थिल्लरबाजी करणे केंद्रातील जबाबदार राजकीय पक्षाला शोभनीय आहे का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. भारतात कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर असले तरी परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत सर्वच राजकीय पक्षांनी आजवर शक्‍यतो एकवाक्‍यता पाळली आहे. परराष्ट्रीय धोरणांच्या बाबतीत भारतातच दुमत किंवा वैचारीक मतभेद आहेत, असे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसू नये यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे लोक एकवाक्‍यतेची खबरदारी घेताना दिसतात. पण भाजप मात्र अलिकडच्या काळात सातत्याने त्याला अपवाद ठरत आहे हे निश्‍चित आक्षेपार्ह आहे. सिद्धू निदान पाकिस्तानच्या निमंत्रणावरून तरी तेथे गेले होते; पण येथे खुद्द आपल्या देशाचे पंतप्रधानच जर पाकिस्तानी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला त्यांच्या निमंत्रणाशिवाय तेथे जाऊन केक खाऊन येणार असतील आणि त्यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांना बनारसी साडीची भेट देणार असतील, तर त्यांच्या या कृतीला आपण काय म्हणणार, हा प्रश्‍नही याच अनुषंगाने उपस्थित होतो.

पण मोदींची ती कृती त्यांच्या भक्तांच्या दृष्टीने “मास्टरस्ट्रोक’ ठरते आणि सिद्धूंची ही कृती मात्र थेट देशद्रोह ठरतो, हे लॉजिक पटण्यासारखे नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आपल्या पाकिस्तान दौऱ्यात पाकिस्तानचे संस्थापक बॅ. जिना यांच्या मझारवर जाऊन माथा टेकून आले आणि “जिना सेक्‍युलर नेते होते,’ असे गौरवोद्‌गार त्यांनी काढल्यानंतर त्यांच्यावर सर्वात जास्त टीका संघ परिवारातल्याच कट्टरपंथीयांनी केली होती. वाजपेयी लाहोरला बसमधून गेल्यानंतर पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढे केला, म्हणून त्यांची प्रशंसा झालेली दिसली. पण त्याचवेळी पाकिस्तानने कारगीलमध्ये घुसखोरी केल्याचेही आढळून आले. त्या युद्धात भारताने पाकिस्तानला नमवल्यानंतर “पाकिस्तान को सबक सिखाया’ म्हणूनही वाजपेयींचेच कौतुक झालेले या देशात पहायला मिळाले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे पाकिस्तानबाबत नेमके काय धोरण आहे हेच आजवर कोणाला उमगले नाही.

एकदा धडा शिकवण्याची भाषा, नंतर मैत्रीसाठी स्वत:हून हात पुढे करून आपलीच पाठ थोपटून घेण्याची भूमिका आणि पुन्हा पाकिस्तानकडून फसगत झाल्याची सततची ओरड या साऱ्या मालिकांमधून भाजपच अनेक वेळा सैरभैर किंवा दिशाहीन झालेली दिसली आहे. पाकिस्तानविषयीच्या धोरण सातत्याच्या अभावाची भाजपची कमतरता सिद्धू प्रकरणावरूनही पुन्हा अधोरेखीत झाली आहे. मुळात सिद्धू यांच्या या दौऱ्याला आणि त्यांच्या तेथील वर्तणुकीला भाजप सारख्या केंद्रातील सत्तधारी पक्षाने डिप्लोमॅटिकली हाताळायला हवे होते. या विषयावरून कॉंग्रेसवर निशाणा साधण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण कॉंग्रेसच्या कोणत्याही राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी भाजपच्या या कुभांडखोरीला उत्तर देण्याइतकेही महत्व दिलेले नाही. सोशल मिडीयावरूनही भाजपच्या प्रवक्‍त्यांवर आणि त्यांच्या भूमिकेवर विरोधी प्रतिक्रीया उमटलेली दिसली.

उलट न बोलावता पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफ यांना गळामिठी मारणाऱ्या पंतप्रधानांच्या कृतीवरच सोशल मिडीयावर मोठे आक्षेप नोंदवलेले दिसले. त्यामुळे हे सारे प्रकरण भाजपच्याच अंगलट आल्यासारखे भासते आहे. सिद्धू यांनीही आपल्यावरील आक्षेपांना मुद्देसूद उत्तरे देऊन आणि आपल्या भेटीचे पूर्ण समर्थन करून आपल्यातील प्रगल्भतेचेच आगळे दर्शन घडवले आहे, जे की, सिध्दूंच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वाच्या अगदी भिन्न वाटले. एरवी “जोकर’ किंवा टीव्ही शोवर थिल्लरपणा करणारे म्हणून हिणावले गेलेले नवज्योत सिद्धू केवळ भाजपच्या नाठाळपणामुळे मुरब्बी राजकारणी ठरत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)