सिद्धनाथवाडीत डेंग्युच्या साथीचे थैमान

सिद्धनाथवाडी ः वाई पालिकेच्यावतीने औषध फवारणी करताना कर्मचारी.

प्रत्येक घरात डेंग्युचा रुग्ण, माजी नगराध्यक्षासह नगरसेवकालाही लागण
वाई, दि. 30 (प्रतिनिधी) – सध्या वाईत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून डेंग्युच्या साथीने थैमान घातले आहे. सिद्धानाथवाडीसह संपूर्ण शहरात डेंग्युचे रुग्ण आहेत. हजारो पेशंट डेंग्युचे असताना आरोग्य विभागाकडून कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत. एकट्या सिध्दनाथवाडीत 170 रुग्णांची संख्या असून सरकारी दवाखान्यासह खाजगी दवाखान्यात पेशंटना उभे राहण्यासाठी जागा शिल्लक नाही. शहरातील सर्वच दवाखाने तुडुंब भरलेले आहेत. विशेष म्हणजे माजी नगराध्यक्षा व नगरसेवक सध्या डेंग्युच्या साथीचे रुग्ण असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिद्धनाथवाडीसह वाई शहरात वाढत असलेल्या डेंग्युच्या रुग्णांमुळे सरकारी दवाखान्यात लांबच लाब रांगा लस घेण्यासाठी लागलेल्या आहेत. परंतु सरकारी दवाखान्यात लसच शिल्लक नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. सिद्धनाथवाडीतील प्रत्येक घरात डेंग्युचा एखादा रुग्ण असून कित्येक रुग्णांना उपचारासाठी पुण्याला पाठवावे लागले आहे. डेंग्युच्या साथीपुढे वाईतील डॉक्‍टरांनी हात टेकले आहेत. शासकीय दवाखान्यात डॉक्‍टरांची कमी असल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. तरी आरोग्य विभागाने त्वरित यावर उपाययोजना करूनही साथ आटोक्‍यात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
सिद्धनाथवाडीत गेल्या तीन महिन्यापासून डेंग्यु साथीने थैमान घातले आहे. होणारा पाणीपुरवठा गढूळ असून वाई नगरपालिकेची शुद्धीकरण यंत्रणा कुचकामी झाली असून ती त्वरित बदलण्याची गरज आहे, वाईची नगरपालिका सध्या फक्त शोपीस बनली आहे. फक्त भव्य इमारत हीच जमेची बाजू आहे. नगराध्यक्ष या नगरसेवक यांना लोकांचे काहीही देणेघेणे नाही. शहराच्या प्रत्येक प्रभागात अतिशय दयनीय अवस्था आहे. शहरातील गटारांची स्वच्छता वेळेवर होत नाही, त्यात कसल्याही पध्दतीची औषध फवारणी केली जात नाही, सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केवळ ठराव होतात, त्यावर अंमलबजावणी मात्र केली जात नाही. शहरातील निघणारा घन कचरा टाकण्यासाठी सध्या जागा उपलब्ध नाही. उचललेला कचरा टाकावयाचा कुठे हा प्रश्न ठेकेदाराला पडला आहे. डेंग्युवर त्वरित उपाय करावेत, अन्यथा वाईकर रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या तयारीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)