सिद्दीकी खूनप्रकरणी सुनावणी सहा वर्षांनंतर सुरू

संशयित दहशतवादी : सत्र न्यायालयासमोर सुनावणी 

पुणे – दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात संशयित दहशतवादी मोहंमद कातील मोहंमद जाफिर सिद्दीकी (वय 26, रा. बिहार) याचा येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये खून केल्याच्या खटल्याची सुनावणी घटनेनंतर तब्बल सहा वर्षांनी सुरू झाली आहे. सोमवारी फिर्यादी तुरूंग अधिकारी चंद्रकिरण तायडे यांची सरतपासणी पूर्ण झाली. उलट तपासणीला सुरूवात झाली आहे. सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांच्या न्यायालयात 8 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोहोळ टोळीचा प्रमुख कुख्यात शरद हिरामण मोहोळ ( वय 34, रा. माऊलीनगर, सुतारदारा, कोथरूड मूळ. मुठा, ता. मुळशी) आणि अलोक शिवाजी भालेराव (वय 28, मुठा, ता. मुळशी) या दोघांवर आरोप निश्‍चिती करण्यात आली आहे. सोमवारी अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी न्यायालयात फिर्यादींची सरतपासणी घेतली. बचाव पक्षातर्फे उलट तपासणी घेण्यास सुरूवात झाली आहे. ही घटना 8 जून 2012 रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास घडली होती. सिद्दीकी याला दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ बॉम्ब ठेवल्याप्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.

त्यानुसार तो तेथील अंडा सेलमध्ये होता. मोहोळ, भालेराव हे दोघेही अंडा सेलमध्ये होते. त्यावेळी “इतक्‍या लोकांना मारून, तुला झोप कशी येते’ अशी विचारणा भालेराव याने सिद्दीकीला केली. त्यावेळी “हम जो कर सकते है, ओ तुम नही कर सकते, यहॉं की पुलीसने मुझे कुछ नही किया, जल्दी दिल्ली जानेवाला हू’ “जामा मशिद, बेंगलोर येथील एका स्टेडियमध्ये बॉम्बस्फोट केला आहे. दगडूशेठ मंदिराजवळही बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला.

बाहेर जावून अर्धवट काम पूर्ण करणार आहे,’ त्याने मोहोळ आणि भालेराव यांना म्हटले. त्यावेळी “हा बाहेर जाऊन दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ बॉम्बस्फोट करण्याचे काम पूर्ण करेल. हा आजच दिल्लीला जाणार आहे. त्याला लगेच मारून टाकू,’ असे म्हणत संगणमत करून दोघांनी बरमुडा पॅन्टच्या नाडीने गळा आवळून सिद्दीका याचा खून केला. दोन्ही नाड्या जाळून त्या संडासच्या भांड्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणात मोहोळ, भालेराव या दोघांवर आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. घटनेनंतर तब्बल सहा वर्षांनी खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी फिर्यादींची सरतपासणी घेतली. उलट तपासणीला सुरूवात झाली आहे. या प्रकरणात 18 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)