सिंहगड परिसरात गढूळ पाण्याने आजारात वाढ

पानशेत- गेले काही दिवस सिंहगड परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाळा सुरू झाला की, येथील समस्यांमध्ये नेहमीच वाढ होताना दिसत आहे. परिसरात प्रामुख्याने शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने येथे आजारांचे प्रमाण वाढले आहे. चहाच्या रंगासारखा गढूळ पाणीपुरवठा सध्या या परिसरात होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार सिंहगड परिसरात दरवर्षीच ही समस्या पावसाळ्याच्या काळात असते, त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. अनेक प्रकारच्या आजारांत येथे वाढ झाली आहे; मात्र, या समस्येकडे येथील प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे तक्रारी समोर येत आहेत.
विविध राजकीय पक्षांनी या भागात सत्ता उपभोगली आहे; पण येथील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्या बाबीकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. यावर्षी देखील पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच गढूळ पाणीपुरवठा येथे होत आहे. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही, म्हणूनच नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे मत भैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे खडकवासला विधान सभा उपाध्यक्ष आर. जी. यादव यांनी मांडले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वर्षांपासून साठून राहिलेला गाळ काढून फिल्टर प्लाण्ट करणे, तसेच गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी वेळेसवर स्वच्छ करण्याचे जनहिताचे काम तातडीने करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
जनतेला स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी काम केले असते तर दरवर्षी सिंहगड परिसरात गढूळ पाणीपुरवठा झाला नसता, असेही येथील नागरिकांनी बोलून दाखवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)