सिंधू, सायना, श्रीकांत, प्रणय उपान्त्य फेरीत

गोल्ड कोस्ट  – अव्वल स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू व सायना नेहवालसह किदंबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणय या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना सहज नमविताना राष्ट्रकुल बॅडमिंटन स्पर्धेतील अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत स्थान मिळविले.

जागतिक व ऑलिम्पिक रौप्यविजेत्या सिंधूने कॅनडाच्या ब्रिटनी टॅमवर 21-14, 21-17 अशी मात करीत कॅनडाच्या गतविजेत्या मिचेली लीविरुद्धच्या उपान्त्य लढतीची निश्‍चिती केली. ग्लासगो स्पर्धेत मिचेलीनेच सिंधूला पराभूत केले होते. सायनाला कॅनडाच्या रॅचेल होन्डरिचला 21-8, 21-13 असे नमविण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. तिच्यासमोर आता ऑलिम्पिक कांस्यविजेत्या स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमूरचे आव्हान आहे.

जगातील अग्रमानांकित किदंबी श्रीकांतने सिंगापूरच्या झिन रेई रियानला 21-15, 21-12 असे पराभूत करून इंग्लंडच्या राजीव औसेफविरुद्धच्या उपान्त्य लढतीची निश्‍चिती केली. तर प्रणयने श्रीलंकेच्या दिनुका करुणारत्नेवर 21-13, 21-6 अशी मात करून ऑलिम्पिक रौप्यविजेत्या मलेशियाच्या ली चोंग वेईविरुद्धच्या उपान्त्य लढतीची निश्‍चिती केली.
सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा या जोडीने गोह सुन हुआत व लेई शेव्हॉन जेमी जोडीवर 21-19, 21-19 अशी मात करीन मिश्र दुहेरीच्या उपान्त्य फेरीत आगेकूच केली. तर अश्‍विनी पोनप्पाने सिक्‍की रेड्डीच्या साथीत श्रीलंकेच्या हसिनी व मधुशिका या जोडीचा 21-11, 21-13 असा धुव्वा उडवून महिला दुहेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. तसेच सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने मलेशियन जोडीचा दणदणीत पराभव करताना उपान्त्य फेरी गाठली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)