नवी दिल्ली – केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने सिंधुदुर्ग-मालवण येथे पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणा-या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टूरीझम ऍण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंटची (आयआयटीटीएम) शाखा उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के. अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांना पत्राद्वारे कळविले आहे.

सिंधुदुर्ग-मालवण भागात आयआयटीटीएमची शाखा सुरु झाल्याने स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवस्थापनाचे तंत्रशुध्द शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कोकणपट्टयात पर्यटन व्यवसायास आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. तसेच या भागाच्या सर्वंक प्रगतीसाठीही ही संस्था महत्त्वपूर्ण ठरेल. कोकणाला 700 कि.मी.ची किनारपट्टी लाभली असून याठिकाणी पर्यटनाच्यादृष्टीने अनुकूल वातावरण आहे.

रम्य निसर्ग व सागरी किना-यांमुळे कोकणात कायम देश-विदेशातील पर्यटकांची वर्दळ असते. या संस्थेच्या स्थापनेमुळे या भागातील पर्यटन विकासाला गती येणार असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्हयातील सोयीच्या जागी प्रस्तावित आयआयटीटीएमची शाखा उभारण्यात यावी. तसेच या संस्थेमध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रमांची सुविधा असावी, अशी विनंती प्रभु यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे केली आहे. संस्थेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)