साहेब, हाच काय विकास?

मुंढवा-घोरपडी उड्डाणपूल प्रस्ताव लालफितीतच 

मंगळवारी सकाळी ऐन कामाच्या वेळेस दीड तास खोळंबा : 2 किमी वाहनांच्या रांगा 


रेल्वे गेट लागल्याने अॅम्ब्युलन्स, शाळकरी मुलेही अडकली

 

-Ads-

पुणे – गेल्या 20 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकांत प्रचाराचा मुद्दा झालेल्या मुंढवा-घोरपडी रेल्वे गेट उड्डाणपुलाचा प्रस्ताव अजूनही लालफितीत आहे. दर 15-20 मिनिटांनी होणारी वाहतूक कोंडी डोकदुखी झाले आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास असाच प्रत्यय आला. या खोळंब्यात अॅम्ब्युलन्स आणि शाळकरी मुले तर अडकलीच, शिवाय चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे “साहेब, हाच काय विकास?’ असा संतप्त सवाल वाहनचालक करत आहेत.

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर मुंढवा गेट आहे. येथून दररोज साधारणपणे 200 रेल्वे धावतात. शिवाय मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे वेगळ्याच आहेत. येथे दर 15-20 मिनिटांनी रेल्वे गेट लागते. तर, तेथून अगदी काही मीटरवर पुणे-मीरज-कोल्हापूर मार्गावरील घोरपडी रेल्वेगेट आहे. या मार्गावरही रेल्वेची मोठी वर्दळ आहे. अनेकदा दोन्हीही गेट एकाच वेळी लागले जातात. यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतून येणारी वाहने आणि मुंढवा तसेच बी.टी. कवडे रस्त्याने वाहने अडकून पडतात. त्यामुळे या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. पण, या त्रासापासून नागरिकांना मुक्‍त करण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी ठोस पाऊल उचलत नसल्याची खंत व्यक्‍त होत आहे. प्रसिद्धी माध्यमांनीदेखील यावर अनेकदा आवाज उठविला. त्यावर या पुलाला मंजुरी मिळाल्याची होर्डिंगबाजी झाली. पण, पुढे एकही नवा दगड या पुलाच्या नावे पडलेला नाही. विकासाच्या नावे उठसुठ बाता मारणारे लोकप्रतिनिधी यावर निर्णय घेत नसल्याचे या मार्गावरील वैतागलेले वाहनचालक वारंवार बोलून दाखवित आहेत.

महानगरपालिका, रेल्वे प्रशासन, लष्कर आणि कॅन्टोन्मेंट या चार प्रशासनांमध्ये ताळमेळ नसल्याने या उपनगरांतून येणाऱ्या पुणेकरांच्या इंधनाची तर नासाडी होतच आहे; शिवाय वेळेचा अपव्यय होतो, तो वेगळाच. वारंवार लागणाऱ्या रेल्वेगेटमुळे अनेकांना कार्यालयात पोहचण्यास वारंवार उशीर होत असून अनेकांच्या वेतनात कपात करण्यात आल्याचे काही वाहनचालकांनी “प्रभात’ला सांगितले.

उड्डाणपुलाच्या प्रस्तावित जागेवरील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी न लागल्याने पुलाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. यावर उपाय काढण्यात आला असून सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे हे पुलाच्या उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच हे काम पूर्ण होईल.
– प्रियंका श्रीगिरी, उपाध्यक्षा, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड


गेल्या 20 वर्षांपासून मी कोरेगांव पार्क परिसरात वास्तव्यास आहे. मुंढवा-घोरपडी रेल्वे गेट परिसरात माझे बालपण गेले आहे. पण, रेल्वे गेट उभारण्याच्या नुसत्या गप्पा केल्या जातात. त्याबाबत ठोस पाऊल उचलण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
– वाहनचालक महिला, मुंढवा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)