साहित्यविश: दुर्गा भागवत 

व्यंकटेश लिंबकर 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची परंपरा हे मराठी भाषेचे एक सांस्कृतिक संचित बनले आहे. एक शतकाहून अधिक काळाची आणि 91 साहित्य संमेलनांची ही साहित्यिक परंपरा अनेकांसाठी मोठी प्रेरणादायी आणि नवसंजीवनी देणारी ठरली आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या स्त्री मानकऱ्यांमधले दुसरे नाव आहे ते दुर्गा भागवत यांचे. (फेब्रुवारी 10, 1910, मध्य प्रदेश – मे 7, 2002)

सुस्पष्ट प्रामाणिक विचार, छोटी छोटी वाक्‍ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. संस्कृत, पाली, प्राकृत, इंग्रजी, मराठी, फ्रेंच, हिंदी इत्यादी भाषांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्वक नोंदविलेले दिसतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते आणि आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे हा समर्थ रामदासांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते.

आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलीभाषेची मांडणी आढळते, तसेच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेले त्यांचे विचारही त्यांच्या साहित्यात दिसून येतात. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्व, सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्‍ती यांमुळे ललित निबंधांच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे. फ्रेंच, जर्मन, संस्कृत इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते.

पैस, तुचक्र, डूब अशा ललित लेखांच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. बाणभट्टाची कादंबरी, जातककथा यांचा अनुवाद करणाऱ्या दुर्गाबाईंनी थोरो या अमेरिकन विचारवंतांच्या पुस्तकाचा वॉल्डनकाठी विचारविहार नावाचा अनुवादही केला. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचा संस्कृतात अनुवाद करण्याचे मोठे कार्य दुर्गाबाईंनी केले.

ऐन आणीबाणीच्या काळात सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे 1975 साली झालेल्या 51व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)