साहित्यविश्‍व : यशोदामाई साने 

व्यंकटेश लिंबकर

साने गुरूजींनी आपल्या भावनांनी ओथंबलेल्या लेखणीने “शामची आई’ हे अजरामर पुस्तक लिहिले. मराठी सारस्वताच्या दरबारांत या मातेची महती सांगणाऱ्या पुस्तकाचे मूल्य एक अनमोल संस्काराचा ठेवा म्हणून मोठे आहे. प्रथमत: 1935 साली प्रसिध्द झालेल्या या पुस्तकाच्या तीनलाखाहून अधिक प्रति निघाल्या असून अनेक भाषेत भाषांतरेही झाली आहेत. दारिद्यातून झगडण्याचे विलक्षण सामर्थ्य व आत्मविश्‍वास या दोन्ही गोष्टी साने गुरूजींच्या आईने म्हणजेच यशोदा साने यांनी दिल्या. कोकणांतीलही एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला आपल्या संस्काराच्या अनमोल ठेव्याने मराठी माणसाच्या स्मृतीत कायमची स्मरणांत राहील! त्या यशोदा साने यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले.

मुले ही म्हातारपणीची आधारकाठी समजली जातात. तो लहान असतांना त्याची हौसमौज मोठ्या हौसेने करणारे आई वडील म्हातारपणांत अत्यंत द:ुखद अवस्थेत जगत असल्याचे चित्र अनेक घरांत दिसते. मुलांना केवळ आई वडिलांचा पैसाच हवा असतो. असे का? ही समाजाची एक शोकांतिकाच आहे. आज अनेक मुले अमेरिकेत किंवा विदेशात नोकऱ्या करतात. मुले आई-वडिलांना पैसा देतात. पण घरांत ते दोघे एकटेच असतात. क्वचित प्रसंगी आई किंवा वडील यापैकी एक जण असले तर परिस्थिती आणखीनच वाईट होते. या वयांत आजारपण आले की, मग मरण हे अनेकांना बरे वाटते. म्हातारपणांत केवळ पैसा काम देत नाही. तर त्यांना हवे असते प्रेम व माया… अन्‌ नेमके हेच त्यांना मिळत नाही. काही जण वृध्दाश्रमांत राहतात. तेथे इतर अनेक जण असतात. त्यांच्या सुखदु:खात ते रममाण होतात. केवळ आला दिवस ढकलणे हेच त्यांच्या हातात असते. आज अशी कितीतरी कुटुंबे आपणांस पहावयास मिळतात. त्यांच्याकडे पैसा आहे, घरदार आहे… पण प्रेमाला ती पारखी झालेली आहेत. मुले लग्नानंतर पत्नीच्या आहारी जाऊन आई वडिलांच्या प्रेमाला पारखे होतात. आजकाल अनेक मुलींनासुध्दा मुलांचे आईवडील नको असतात. काही मुलीतर लग्नाच्या अगोदर अशी अट सरळसरळ घालतांना दिसत आहेत. बदलत्या पाश्‍चात्य संस्कृतीचे हे दर्शन होय !..

या सामाजिक परीस्थितीत शामच्या आईचे म्हणजेच यशोदा सदाशिव साने यांचे व्यक्तिचित्र आजच्या पिढीला अत्यंत मह्त्वाचे वाटते आहे. साने गुरूजींची आई एक खेड्यांतील एक सामान्य महिला होती. संस्काराचे धडे बालपणांतच तिच्या आई-वडिलांनी दिले होते. साने गुरूंजीच्यावर तिने तेच संस्कार केले होते. गरिबीतही श्रीमंती वृत्तीने राहता येते हे तिने साने गुरूजींना शिकवले. गरिबी किंवा श्रीमंती ही पैशावर अवलंबून नसून संस्काराच्या ठेव्यावरच ती अवलंबून असते हे तत्व तिने श्‍यामच्या मनावर बिंबविले.

प्रसिध्द कवी वसंत बापट यांनी यशोदामाईंना “सामान्यातील असामान्य’ असे आदराने म्हटले आहे. दारिद्यांतही स्वाभिमान कसा ठेवावा हे श्‍मामच्या आईकडूनच शिकावे. अनेक कठीण प्रसंगातून श्‍यामच्या आईने श्‍यामला शिकविले. म्हणूनच साने गुरूजींसारखा एक संस्कारक्षम हिरा तिने महाराष्ट्राला दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)