साहित्यविश्‍व: मालतीबाई बेडेकर

व्यंकटेश लिंबकर

मालतीबाई बेडेकर या विख्यात मराठी कादंबरी लेखिका होत. जन्म कुलाबा (विद्यमान रायगड) जिल्ह्यातील आवास या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात. शिक्षण घोडनदी, हिंगणे आणि मुंबई येथे प्रदेयागमा’ (पी.ए.) ही कर्वे विद्यापीठाची, एम.ए.च्या दर्जाची, पदवी त्यांनी मिळविली. 1980 साली मुंबई येथे भरलेल्या समांतर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. वर्ष 1938 साली विश्राम बेडेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बाळूताई खरे हे त्यांचे विवाहापूर्वीचे नाव होय. प्रागतिक विचारांचे वडील, महर्षी अण्णासाहेब कर्वे, वामन मल्हार जोशी, श्री. म. माटे ह्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांचे पती विश्राम बेडेकर ह्यांचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.

-Ads-

हिंगणे येथील कन्याशाळेच्या त्या काही काळ शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या. त्यानंतर सोलापूर येथे, सरकारच्या शिक्षण व कल्याण खात्यात पर्यवेक्षिका म्हणून त्यांनी नोकरी केली (1937-40). तेथे असताना गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमातीचा जवळून अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. महिला सेवाग्राम’ ह्या संस्थेतही त्यांनी केस रिव्ह्यू बोर्डावर 10 वर्षे विनावेतन काम केले (1952 -62). अनाथ, विधवा, परित्यक्ता अशा विविध प्रकारच्या दुःखी स्त्रियांच्या समस्या त्यांना तेथे अभ्यासता आल्या. 1925 सालापासूनच त्या लेखनाकडे वळल्या. अलंकारमंजूषा (1931) आणि काशीनाथ नरसिंह केळकर ह्यांच्याबरोबर लिहिलेला हिंदू व्यवहार धर्मशास्त्र (1932) ह्या ग्रंथांचा समावेश त्यांच्या आरंभीच्या लेखनात होतो. अलंकारमंजूषा हा अलंकार शास्त्रावरील ग्रंथ असून हिंदू व्यवहार धर्मशास्त्रात हिंदू कायद्याचे सोपे, सुबोध विवेचन आहे. हे दोन्ही ग्रंथ मालतीबाईंच्या व्यासंगाची साक्ष देतात.

तथापि कळ्यांचे निःश्‍वास (1933) हा त्यांचा पहिला कथासंग्रह विभावरी शिरुरकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध होताच मराठी साहित्यविश्‍वात मोठीच खळबळ उडाली. पुरुषी अहंकाराचे स्त्रियांवर होणारे आघात, वाढत्या कौमार्यकाळामुळे त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा ह्यांचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन त्यांनी ह्या संग्रहातील जिवंत कथातून घडविले होते. सहनशीलतेचा अंत झालेल्या स्त्रीमनाच्या विद्रोहाचा हा एक स्फोट होते. त्यामुळे विभावरी शिरुरकर हे नाव धारण करणारी व्यक्ती कोण असावी, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला.

पुढे “साखरपुडा’ या मराठी चित्रपटासाठी त्यांची कथा घेतली गेली, तेव्हा विभावरी शिरुरकर म्हणजे मालतीबाई बेडेकर होत, हा गौप्यस्फोट झाला. “कळ्यांचे निःश्वास’ ह्या कथासंग्रहानंतर “हिंदोळ्यावर’ (1934), “विरलेले स्वप्न’ (1935), “बळी’ (1950), “जाई’ (1952), ‘शबरी” (1962) ह्यासांरख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. आपल्या कादंबऱ्यातूनही, मराठी साहित्यात दीर्घकाळ अव्यक्त राहिलेले स्त्रियांच्या व्यथांचे एक वेगळे वेदनाविश्व त्यांनी अत्यंत प्रांजळपणाने साकार केले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनाची पकड तर घेतलीच; पंरतु मराठी साहित्यश्रेष्ठींचे कुतूहलही जागृत केले. त्यांच्या बळी ह्या कादंबरीने मात्र एका नव्याच जाणिवेला वाट करून दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)