साहित्यविश्‍व: निवडीच्या प्रयत्नांना तीन दशकांनी यश

व्यंकटेश लिंबकर 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी आग्रही असलेल्या, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्‍त केलेले मनोगत लक्षणीय असून, वाचकांसाठी ते येथे “प्रथमपुरुषी एकवचनी’ या स्वरुपात देत आहे…

-Ads-

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड करावी, या प्रयत्नांना तीन दशकांनी यश आले आहे. डॉ. अरुणा ढेरे यांच्या निवडीमुळे शारदेच्या देव्हाऱ्यात सात्विक सरस्वतीची प्रतिष्ठापना झाली आहे, असे मला वाटते.मराठी भाषा संस्कृतीला ललामभूत असलेल्या अखिल भारतीय व्याप्तीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभावान साहित्यिकांनी मतांचा जोगवा मागावा, याला माझा स्वत:चा प्रथमपासूनच विरोध होता.

तीस वर्षांपूर्वी निवडणूक लढविताना जवळच्या मित्राचा पराभव करून माझी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. तेव्हापासूनच ही संपूर्ण मतदान प्रक्रिया मला खटकत होती. संमेलन अध्यक्षपदसाठी निवडणूक घ्यायला ती बॅंक नाही, पतपेढी किंवा साखर कारखानाही नाही. तसेच संमेलन अध्यक्ष हे कोणतेही सत्ताकेंद्रही माही. गानसम्राज्ञी लता मंगेशकर की गानसरस्वती किशोरी आमोणकर किंवा स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी की पं. कुमार गंधर्व यांच्यात श्रेष्ठ कोण, हे काय निवडणूक आणि मतदान घेऊन ठरवणार का? मग, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सन्मानानेच निवडला गेला पाहिजे, अशीच माझी प्रथमपासूनची भूमिका होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ जोपर्यंत ही प्रक्रिया बदलत नाही, तोपर्यंत कोकण मराठी साहित्य परिषद महामंडळात समाविष्ट राहणार नाही, अशीही कणखर भूमिका आम्ही घेतली होती. मात्र ही मागणी पूर्ण व्हायला तीस वर्षांचा प्रदीर्घ कालखंड जावा लागला, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारी व्यक्ती पुढे जाऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष होते.

डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्यानंतर आता अरुणा ढेरे यांना सन्मानाने हे पद देण्यात आले आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. म्हणूनच आता डॉ. अरुणा ढेरे यांचा उल्लेख नवनिर्वाचित असा न करता नवनियुक्‍त अध्यक्ष असाच केला पाहिजे. गेली 30 वर्षे मी संमेलन पाहतो आहे. आता माझ्या मनासारखे संमेलन होणार आहे याचा आनंद झाला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)