साहित्यविश्‍व “घुंगूरनाद’: कथकविषयीची सांगोपांग माहिती 

– अंजली कुलकर्णी 

“घुंगूरनाद’ हे मीना शेटे-संभू या सिद्धहस्त लेखिकेचे कथकवरचे पुस्तक आहे. कथकविषयी स्थानिक भाषांमध्ये तुरळक पुस्तके आढळतात. त्यामुळे सहसा लोकांना हिंदी, इंग्लीश पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. परंतु आपल्या भाषेत कथक नृत्यावरचे पुस्तक वाचण्याचा विलक्षण आनंद या पुस्तकातून मिळतो. काही पुस्तकांतील मजकूर एकत्र करून आपल्या नावावर छापण्याची हल्ली चढाओढ दिसते. परंतु हा मोह इथे टाळल्याचे आढळते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भरपूर संदर्भ वापरून त्यावरून आपले विचार मांडण्याचे संशोधनपर वृत्तीतून केलेले हे लेखन आहे. पंडित बिरजू महाराज या जगप्रसिद्ध नृत्याचार्यांनी या पुस्तकाला दीड पानाची प्रस्तावना दिली आहे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आणि लेखिकेचा गौरव आहे. बिरजू महाराज यांच्याविषयी माहिती नसलेली व्यक्ती सापडणे विरळाच. या अवलियाने या पुस्तकाची प्रशंसा केल्यावर खरे तर आणखी कोणी त्यावर आपले मत प्रदर्शित करण्याची गरज उरत नाही. त्यांच्याबरोबरच पंडित रामलालजी बरेठ या त्यांच्याच तोडीच्या दुसऱ्या ज्येष्ठ आचार्यांनी पुस्तकासाठी अभिप्राय दिला आहे. या दोन्ही पंडितांनी स्थानिक भाषांमध्ये अशी पुस्तके आली तर कथकच्या प्रसाराला मोठा हातभार लागेल असे म्हटले आहे. पुस्तक वाचल्यानंतर आपल्याही मनात अशीच भावना निर्माण होते.

या पुस्तकात प्रामुख्याने घराण्यांविषयीच्या माहितीचा ऊहापोह करण्यात आला आहे. सहसा घराण्याची माहिती सांगताना नेमकेपणापेक्षा श्रेष्ठत्व कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु इथे लेखिकेने कोणत्याही घराण्याला झुकते माप न देता निःपक्षपातीपणे सर्व घराण्यांची वैशिष्ट्ये, त्याबरोबरच घराण्याची परंपरा आणि ज्येष्ठ गुरूंची चरित्रे दिली आहेत. कथकच्या परीक्षांच्या वेळी दिली जाणारी वैशिष्ट्ये त्रोटक असतात. लेखिकेने अनेक गुरूंशी चर्चा करून, अनेक पुस्तकांतून अभ्यास करून प्रत्येक घराण्याचे प्रकरण लिहिले आहे. ही बाब या पुस्तकाच्या बाबतीत आणि कथकवरील इतर पुस्तकांमध्येही आगळीवेगळी ठरते. याखेरीज घराणे म्हणजे काय याचेही तर्कशुद्ध, विविध संदर्भ देत विश्‍लेषण केले आहे. लेखनातील सुस्पष्टता आणि नेमकेपणा हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे.

मीना शेटे-संभू यांनी गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून लिहिलेले उपसंहार हे प्रकरण आवर्जून वाचले पाहिजे. कारण यात लेखिकेने स्वतःची मते स्पष्टपणे मांडली आहेत. अलीकडे गल्लीबोळात कथकचे वर्ग दिसतात. त्यांच्या दर्जाविषयीचा प्रश्‍न त्यांनी समोर आणला आहे. पंडित बिरजू महाराजांनी हा मुद्दा समोर आणण्यासाठीही त्यांचे कौतुक केले आहे. कारण सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ मंडळींची फौज समोर येते. हिणकस गोष्टी कालौघात टिकत नाहीत, हे खरे; परंतु तोपर्यंत त्यांच्यामुळे अनेक लोकांची दिशाभूल झालेली असते. त्यामुळे गुरू शिष्यांना पारखून घेतातच; परंतु हल्लीच्या युगात योग्य गुरूची निवड करणेही अतिशय महत्त्वाचे ठरते या महत्त्वाच्या मुद्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सुरुवातीच्या परीक्षांना भराभरा बसवणे आणि नंतरच्या परीक्षांसाठी 5-6 वर्षे विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवणे या काही शिक्षकांच्या वृत्तीवरही त्यांनी भाष्य केले आहे. अशा वृत्तीमुळे विद्यार्थ्यांची रुची कमी होते आणि अर्धशिक्षित विद्यार्थी बाहेर पडतात. परीक्षा म्हणजे तज्ज्ञता नव्हे हे मान्य; मात्र तज्ज्ञतेच्या दिशेने जाण्यासाठीचे ते एक छोटे परिमाण नक्कीच आहे. म्हणून विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पूर्वी आपली विद्या आपल्यापुरतीच ठेवण्याच्या वृत्तीतून अनेक प्राचीन कला आणि त्यांच्यातील महत्त्वाच्या गोष्टी नामशेष झाल्या हेही इथे लक्षात घेतले पाहिजे.

कथकमध्ये नेहमीच लखनौ, जयपूर आणि बनारस ही तीनच घराणी मानली जातात. परंतु रायगढ हे चौथे घराणे असूनही ते या तिन्हींच्या संगमातून तयार झाल्यामुळे उपेक्षित राहिले आहे. ही उपेक्षा या पुस्तकात दूर करण्यात आली असून इतर तीन घराण्यांप्रमाणेच या घराण्यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे या घराण्याची वैशिष्ट्ये आणि त्याची परंपरा व गुरू यांना मराठीमध्ये प्रकाशात आणण्याचे मोलाचे काम हे पुस्तक करते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या कथक कलाकारांची समग्र माहिती देणारेही हे पहिलेच पुस्तक असावे. त्याबरोबरच पुण्याचा नृत्य इतिहासही इथे तपशीलवार मांडण्यात आला आहे. साहजिकच केवळ कथकविषयीच्या पुस्तकांमध्येच नव्हे; तर कलाविषयक पुस्तकांमध्ये या पुस्तकाने मोठी भर पडली आहे असे म्हणणे उचित ठरेल. लेखिकेने अधिकाधिक अचूकता आणण्यासाठी अनेकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला आहे. पुण्यातील ज्येष्ठ गुरूंकडून घराण्याच्या प्रकरणांवर चर्चा करून मार्गदर्शन मिळवले आहे. त्यामुळे हे पुस्तक खरोखरच अभ्यासपूर्ण परिश्रमातून साकारले आहे.

मीना शेटे-संभू यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक शोधवृत्तमालिका लिहिल्या आणि त्या गाजल्याही. मात्र त्यानंतर गेली 7-8 वर्षे त्यांनी लेखन क्षेत्रातही तीच धडाडी दाखवली आहे. या काळात तब्बल 50 नामवंत लेखकांच्या इंग्लीश पुस्तकांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे आणि नावाजलेल्या प्रकाशनसंस्थांनी ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. शिवाय त्यांनी 10 स्वतंत्र पुस्तकेही लिहिली आहेत. झपाट्याने लेखन करताना दर्जात कसलीच तडजोड न करणाऱ्या या लेखिकेच्या या विलक्षण गतिमानतेने थक्‍क व्हायला होते. या पुस्तकातही त्यांनी दर्जा आणि तपशीलवार, सुस्पष्ट, संशोधनपर लेखन ही आपली वैशिष्ट्ये जपली आहेत. देविदास पेशवे यांनी पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ तयार केले आहे आणि विश्‍वकर्मा पब्लिकेशनने आपली संशोधनपर, अभ्यासू पुस्तके छापण्याची परंपरा या पुस्तकाद्वारे पुढे नेली आहे. या पुस्तकाचा इंग्लीश आणि हिंदी भाषांत अनुवादही होत आहे ही आणखी चांगली गोष्ट आहे, त्यामुळे ते देशभर सर्वत्र पोहोचू शकेल.

पुस्तक : घुंगूरनाद ; लेखिका : मीना शेटे – संभू 
प्रकाशक : विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे. किंमत : 300 रुपये 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)