साहित्यविश्‍व : कुसुमावती देशपांडे 

व्यंकटेश लिंबकर 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या परंपरेतील जी पहिली लेखिका अध्यक्षपदी विराजमान झाली, त्या म्हणजे कुसुमावती देशपांडे. त्यांचे माहेरचे नाव कुसुम जयवंत. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. (जन्म : अमरावती, 10 नोव्हेंबर, 1904; निधन : नागपूर, 17 नोव्हेंबर, 1961) या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या. त्यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. मराठी वाङ्‌मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन फार मोलाचे आहे. कुसुमावती यांचे वडील अमरावतीत वकिली करत. कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) हे त्यांचे पती होत.

पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून 1921 साली मॅट्रिक झाल्यावर त्या दोन वर्षे पुण्याच्याच फर्ग्युसन कॉलेजात होत्या. त्यानंतर नागपूरला जाऊन त्यांनी नागपूर विद्यापीठातून 1926 साली बी.ए.ची पदवी घेतली. इंग्रजी वाङ्‌मयाचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्या इंग्लंडमधील वेस्टफील्ड कॉलेजात दाखल झाल्या. तेथून त्या 1929 साली बी.ए.(इंग्रजी वाङ्‌मय) झाल्या. नवी दिल्ली येथे त्या आकाशवाणीवरील स्त्रिया आणि मुलांच्या कार्यक्रमाच्या एक प्रमुख निर्मात्या होत्या. “पासंग’ या 1954 साली प्रकाशित झालेल्या संग्रहात त्यांच्या लेखांचे संकलन आहे.

1929 साली त्यांचे कवी अनिल यांच्याशी लग्न झाले. हा प्रेमविवाह होता. जात वेगळी असल्याने घरातून झालेला प्रचंड विरोध सहन करून हे लग्न झाले. कुसुमावती देशपांडे यांच्या प्रकाशित साहित्यामध्ये त्याचा पती अनिल यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराचा संग्रह “कुसुमानिल’ हे एक उल्लेखनीय पुस्तक आहे. मराठीमध्ये अशा प्रकारचे पत्रवाङमय प्रथमच अवतरले. तसे “दीपकळी’ (1934), “दीपदान’ (1940), “दीपमाळ’ “पासंग’ (1954), “मराठी कादंबरी : पहिले शतक’ (1953) तसेच “मोळी’ (1945) अशी अन्य पुस्तके आहेत.

एका कार्यक्रमाला कवी अनिल गेले होते. परत आल्यावर घराचे दार वाजवले पण काहीच प्रतिसाद आला नाही. अनिलाना वाटले नेहमी सारखी आपली प्रिया रुसून बसली आहे.रात्रभर अनिल बाहेरच थांबले. पण नंतर दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांची जीवनसंगीनी चिरनिद्रेत गेली होती. तिचा निष्प्राण देह बघून नशिबी हे काय आलं? या विचाराने अनिल पूर्ण कोसळून गेले. तेव्हा अनिलांच्या लेखणीतून “अजुनी रूसूनी आहे, खुलता कळी खुलेना…’ ही कविता उमटली. ही कविता जर गीत होणार असेल तर ते केवळ कुमार गंधर्व गातील असा अनिलांचा आग्रह होता. त्याप्रमाणे ही भावस्पर्शी कविता कुमार गंधर्वांनी आपल्या अमृततुल्य स्वरात गायली आणि अमर केली. दि. 26 ते 29 ऑक्‍टोबर 1961 या कालावधीत ग्वाल्हेर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)