साहित्यविश्‍व; इरावती कर्वे

व्यंकटेश लिंबकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्याप्रमाणे आजवर अवघ्या पाच लेखिकांना विराजमान होता आले, थोडीफार तशीच स्थिती साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिकांमध्ये आहे. त्यामध्ये इरावती कर्वे (युगान्त – 1968), दुर्गा भागवत ( पैस – 1971), गोदावरी परुळेकर ( जेव्हा माणूस जागा होतो – 1972), इंदिरा संत (गर्भरेशीम-1984) विजया राजाध्यक्ष (मर्ढेकरांची कविता – स्वरुप आणि संदर्भ – 1993), आशा बगे (भूमी – 2006) अशा निवडक लेखिकांचा समावेश आहे.

इरावती कर्वे (जन्म: डिसेंबर 15, 1905, म्यानमार – मृत्यू :ऑगस्ट 11, 1970) या मराठी लेखिका होत. इरावती कर्वे यांचा जन्म म्यानमारमधील मिंज्यान येथे डिसेंबर 15, 1905 रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर होय. प्रा. दि.धों.कर्वे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते.इरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ हा विषय घेऊन त्या एमए झाल्या. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या.

‘मनुष्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणात’ या विषयावर बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी प्राप्त केली. परतल्यावर काही काळ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. 1939 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. 1955 साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले. त्यांना जाई (निंबकर), आनंद, गौरी (देशपांडे) अशी तीन अपत्ये झाली. गौरी देशपांडे या सुप्रसिद्ध लेखिका तर डॉ. आनंद कर्वे हे पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत.

इरावती कर्वे यांचे प्रकाशित झालेले साहित्य असे आहे – युगान्त हा महाभारतावरील समीक्षा ग्रंथ. याच ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. ललित लेखसंग्रह – गंगाजल, परिपूर्ती, भोवरा असे आहेत. तर समाजशास्त्रीय ग्रंथ यामध्ये आमची संस्कृती, धर्म, मराठी लोकांची संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास, संस्कृती, हिंदू समाज एक अन्वयार्थ, हिंदूंची समाज रचना असे ग्रंथ आहेत. याशिवाय इंग्रजी भाषेमधूनही इरावती कर्वे यांचे बारा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)