साहित्यविश्‍व: आशा बगे

व्यंकटेश लिंबकर

आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत. त्यांच्या “भूमी’ या कादंबरीला 2006 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात “सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा “रुक्‍मिणी’ 1980 साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री. पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला व नंतर मौज व बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा 2018 सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार 13 लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.

आशा बगे यांचा “मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर भूमी’ व त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. “भूमी’ कादंबरीमध्ये त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. माणसांचा स्वभाव, त्यांचे एकमेकांशी संबंध याला काही प्रमाणात परिस्थिती कारणीभूत ठरते. म्हणूनच कधी कधी रोज भेटणारी, जवळची माणसे यांच्याशी नाळ जुळत नाही, पण दूरच्यांशी स्नेह जुळतो. अशा मानवी स्वभावाचे कंगोरे ‘भूमी’ या कादंबरीतून दिसतात. 2004 च्या ‘त्सुनामी’मध्ये सापडलेल्या तामिळनाडूतील ‘कडलूर’ ह्या गावातील एका मुलीची ही कहाणी. आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून स्वतःचा शोध घेणाऱ्या मैथिलीची ही कहाणी एक वेगळाच अनुभव देते. “दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला.

आशा बगेंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठ्या व एकत्रित कुटुंबात गेले. त्याहीमुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.

विदर्भ साहित्य संघाने पहिल्यांदा लेखिका संमेलन घेतले तेव्हा त्यांनी अगदी आनंदाने अध्यक्षपद स्वीकारले. 2012 चा मालतीबाई दांडेकर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. वर्ष 2018 मध्ये राम शेवाळकर यांच्या नावाचा (पहिला) साहित्यव्रती पुरस्कारही त्यांना मिळाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)