अघोरी कृत्याच्या आधारे उपचार करण्याच्या बहाण्याने केले हे कृत्य

पुणे – अघोरी विद्या, जादुटोण्याच्या आधारे आजारी महिलेवर उपचार करण्याचे अमिष दाखवून तिच्यावर आणि तिच्या सासुवर बलात्कार, तिच्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भोंदु मौलवीचा जामीन न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के.मणेर यांनी हा आदेश दिला आहे.

हैदरअली अब्दुलरशिद शेख (वय 47, रा. सातारा) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत कोंढवा भागात राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने खडक पोलिसात फिर्याद दिली आहे. 14 डिसेंबर 2004 ते सन 2016 या तब्बल 12 वर्षाच्या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादींना उलट्या, चक्कर आणि बेशुध्द होण्याचा त्रास होता. हैदरअली दैवी शक्तीच्या आधारे उपचार करत असल्याची माहिती त्यांच्या सासूला होती. त्यामुळे याबाबत हैदरअली याला सांगण्यात आले. त्यावेळी भुतपिशाच्च झाले आहे, असे सांगून दैवी शक्तीच्या आधारे उपचार करण्याचे आश्‍वासन त्याने दिले.

फिर्यादीस पाण्यात मिसळून काहीतरी पिण्यास देऊन त्यांच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर त्यांच्या सासूशीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर उपचारासाठी म्हणून फिर्यादीच्या पतीकडून 8 लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी महिलेचे काढलेले मोबाईलमधील अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन टाटा सुमो, तवेरा, स्कोडा, बुलेट, करिश्‍मा दुचाकी आणि संट्रो कार आणि सातारा येथे एक ऑफीस घेतले. या प्रकरणात खडक पोलिसांनी हैदरअली याला अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पूर्वी त्याचा एखदा जामीन फेटाळला होता. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्याने दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. केवळ दोषारोपपत्र दाखल झाल्याने परिस्थितीत बदल होत नाही.

त्याच्यावर वाई आणि बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. यावरून तो सराईत असल्याचे दिसून येत आहे. फिर्यादी यांचेशी अश्‍लील चित्रण केलेला मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अभिप्राय अद्याप आलेला नाही. 14 वर्षीय मुलीने त्याने केलेल्या कृत्याची माहिती 164 प्रमाणे नोंदविलेल्या जबाबामध्ये दिली आहे. त्याच्या घराच्या झाडाझडतीमध्ये जादुटोणासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने शेख याचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)