सासवडमध्ये दुभाजकाचे गज उघडे

सासवड-कोंढवा महामार्गावरील स्थिती : सार्वजनिक बांधकाम विभागाचा कानाडोळा

सासवड- सासवड शहरातून सासवड-कोंढवा महामार्ग जातो. या महामार्गावर सासवड शहरातील हुंडेकरी चौक ते उपविभागीय पोलीस कार्यालय दरम्यान रस्ते दुभाजक बसविण्यात आले आहेत. मात्र या रस्ते दुभाजकांना सूचना फलक, रेडियम, रिफ्लेक्‍टर नसल्यामुळे मोठ्या वाहनांची धडक बसून या दुभाजकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर दुभाजकांसाठी वापरलेले धारदार लोखंडी गज उघडे पडल्यने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. मात्र, एखादी दुर्घटना घडल्यास जबादारी कोणाची असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सासवड शहरातील रस्त्याच्या ज्या भागात दुभाजक तुटलेल्या स्थितीत आहेत. तो शहराचा मध्यवर्ती भाग असून याठिकाणी वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. तसेच शालेय विद्यार्थी, नागरिक यांची मोठी वर्दळ असते. पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागास या बाबतीत वारंवार विचारणा करूनही कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. भोर उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी)यांच्या कार्यालया समोरच हे तुटलेले दुभाजक आहे.तरीदेखील याकडे पोलिस प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत आहे. या तुटलेल्या धोकादायक दुभाकांची त्वरित दुरुस्ती करुन दूभाजकांना रिफ्लेक्‍टर, रेडियम, सुचना फलक लावण्याची सासवडचे नागरिकांनी वारंवार मागणी केली असूनही पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

  • सहा दिवस उलटूनही कार्यवाही नाही
    प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पुरंदर तहसीलमध्ये आयोजित चहापान कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी प्रातांधिकारी,तहसीलदार, डीवायएसपी, सासवड पोलीस निरीक्षक, असे सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तेव्हा सासवड शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, राजकीय नेत्यांनी या तुटलेल्या धोकादायक दुभाजकांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, या कार्यक्रमास आज तब्बल सहा दिवस होऊनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होते आहे.
  • सासवड-कोंढवा रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून येत्या 15 दिवसांत तुटलेल्या दुभाजकांची दुरुस्ती करून रिफ्लेक्‍टर लावले जातील.
    – डी. आर. गायकवाड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरंदर
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)