सासरच्यांनी महिलेला किटकनाशक पाजले

पिंपरी – सासऱ्याला पिण्यासाठी दारू आणून दिली नाही. या कारणावरून सासू, सासरे आणि दोन नणंदांनी मिळून विवाहितेचा कीटकनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना आळंदीजवळील गोलेगाव येथे घडली. याबाबत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू बाबू चौधरी, चंपा बाळू चौधरी (दोघे रा. गोलेगाव, ता. खेड), सुरेखा बबन वाघोले (रा. दारुंबरे, ता. मावळ), रेखा दादा गव्हाणे (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिता संतोष चौधरी या 32 वर्षीय विवाहितेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या सासऱ्यांना दारू पाहिजे होती. ती त्यांनी फिर्यादी महिलेला आणण्यास सांगितली. महिलेने दारू आणण्यास नकार दिला. यावरून रागावलेल्या सासऱ्याने फिर्यादी महिलेला हाताने, काठीने मारहाण केली. त्यात फिर्यादीची सासू आणि दोन नणंदांनी साथ दिली. तसेच फिर्यादी महिलेने सासरी राहू नये अशी दमदाटी आणि शिवीगाळ करत घरातील सदाबहार कीटकनाशक औषध फिर्यादी महिलेला पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार 15 जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. याबाबत मारहाण आणि जावे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक डी एल शिंदे तपास करीत आहेत.

सासरी राहू नये यासाठी छळ
याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, अनिता चौधरी यांच्या पतीचे 2012 मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे तिने सासरी राहू नये यासाठी तिचा छळ सुरू होता. किरकोळ कारणावरूनही वारंवार मारहाण, टोमणे असे प्रकार सुरू असतात असे अनिता यांनी तक्रार नोंदविताना सांगितले. मात्र आता हा प्रकार जीवघेण्यापर्यंत पोहचला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 15 जानेवारीलाही जबरदस्तीने किटकनाशक पाजण्यात आले. त्यानंतर अनिता या बेशुद्ध पडल्या. शेजारच्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरु होते. बरे वाटल्यानंतर त्यांनी सासरच्या मंडळींची तक्रार दिली व त्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. एल. शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)